Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:21 IST2025-09-27T19:56:02+5:302025-09-27T20:21:58+5:30
हवामान विभागाने मुंबईत रविवारी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.

Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
Mumbai Red Alert: परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावे असं आवाहन केलं आहे.
हवामान खात्याने रविवारी मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. २८ सप्टेंबर व्यतिरिक्त २९ सप्टेंबर रोजीही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी सकाळीही मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच कोकण-गोवा मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Just in: IMD has issued Red Alert 🔴 for Mumbai, Thane & Palghar on September 28 amid extremely heavy rain with Thunderstorm & wind gusts at isolated places. #MumbaiRainspic.twitter.com/54qPAiLa9N
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) September 27, 2025
हवामान खात्याने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. दुसरीकडे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २८ सप्टेंबरसाठी राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.