Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
By मोरेश्वर येरम | Updated: June 5, 2025 18:00 IST2025-06-05T17:59:45+5:302025-06-05T18:00:31+5:30
Churchgate Station Fire: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे.

Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
Churchgate Station Fire:पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात धुराचे लोट चर्चगेट स्थानकातून बाहेर येत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चर्चगेट स्थानकात शॉर्ट सर्किटमुळे एका दुकानात आग लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. घटनेच्या काही मिनिटांत अग्निशमन दल पोहोचून आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासन देखील पोहोचले आहे.
VIDEO: चर्चगेट रेल्वे स्थानकात आग, धुराचे प्रचंड लोट, प्रवाशांची धावपळ pic.twitter.com/BuS3XMnoRv
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) June 5, 2025
संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. चाकरमान्यांची कामावरुन घरी परतण्याची वेळ असल्यानं स्थानकात प्रवाशांची बरीच गर्दी आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गाआधी असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दुकानांपैकी मॉन्जिनीज केक शॉपमध्ये आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच या आगीमुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम नाही
चर्चगेट रेल्वे स्थानकावर लागलेली आग ही पादचारी सबवेच्या ठिकाणी असलेल्या एका दुकानात लागली होती. हे ठिकाण मुख्य रेल्वे ट्रॅकपासून बरंच दूर आहे. यामुळे रेल्वे सेवेला याचा कोणताही फटका बसलेला नाही. पश्चिम रेल्वेची सेवा वेळेत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुकानात लागलेली आगही विझवण्यात आली असून सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.