Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:06 IST2025-06-17T17:04:21+5:302025-06-17T17:06:26+5:30

Mumbai Crime: संपत्तीसाठी पोटच्या मुलाने आईला मारहाण करत कागदपत्रे बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Man beat elderly mother | Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!

Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!

मुंबई: संपत्तीसाठी पोटच्या मुलाने आईला मारहाण करत कागदपत्रे बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. याबाबत जुहू परिसरात राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध आईने खार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी महिलेच्या मुलावर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

तक्रारदार यांच्या पतीचा फर्निचर, कार्पेट, पुस्तक आणि पितळीच्या स्टॅच्यूचा व्यवसाय होता. हे साहित्य ते चित्रपटांसाठी भाडेतत्त्वावर देत होते. हे सामान ठेवण्यासाठीचे गोडाऊन जोगेश्वरी पश्चिमच्या सिद्दीकी इस्टेटमध्ये आहे. तक्रारीनुसार पीडितेचा मुलगा हा रागीट स्वभावाचा असून व्यसनी आहे. यामुळे बऱ्याचदा तो त्याच्या पत्नीला शिवीगाळ करायचा तसेच आई-वडिलांनाही मानसिक त्रास द्यायचा. अशात ९ सप्टेंबर, २०२१ मध्ये अटॅक येऊन वडिलांचा मृत्यू झाल्याचा एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे.

मुलाने त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांना तक्रारदाराकडे सोडून अन्य महिलेसोबत राहायला सुरुवात केली. या दरम्यान त्याने आईला धमकावून करोडो रुपयांचे दोन फ्लॅट तसेच गोडाऊनमधील बऱ्याच वस्तू विकल्या. हा सगळा प्रकार त्याने तिला धमकावत आणि मारहाण करून केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. आता या महिलेकडे फक्त गोडाऊन उरले असून त्याचीही विक्री करण्यासाठी मुलगा दबाव टाकत असल्याचे तक्रारदाराने नमूद केल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: Mumbai Man beat elderly mother