Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:07 IST2026-04-10T18:06:43+5:302026-04-10T18:07:58+5:30
Mumbai Bandra Water Pipe Burst: बांद्रा परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्ते जलमय झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
मुंबईतील बांद्रा परिसरात आज पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्ते जलमय झाले असून वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जलवाहिनी फुटल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून त्यामुळे कामावर जाणे किंवा घरी परतणे कठीण झाले आहे, अशा शब्दात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
So in other news
— Vedant Lamba (@vedulamba) April 10, 2026
Bandra is flooding now
I think a pipe or smthn burst pic.twitter.com/pA1fluEW95
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील एका मुख्य रस्त्यावरील जलवाहिनी अचानक फुटली. पाण्याची दाब इतका प्रचंड होता की, काही वेळातच संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले दिसत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक वाहनचालकांना आपला मार्ग बदलावा लागत आहे. तर, पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, पाणीपुरवठा थांबवून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल? याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.