Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:30 IST2025-09-02T08:28:13+5:302025-09-02T08:30:08+5:30

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांंना बसला.

Mumbai: Major traffic jam in Mumbai; Employees face difficulties while reaching office | Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!

Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांंना बसला. आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकासह आजूबाजूचा परिसर आंदोलकांनी गजबजल्याने लोकल रेल्वेने आलेल्या नोकरदारांना फलाटावर पहिले पाऊल टाकल्यापासून त्रास सहन करावा लागला. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे चित्र होते.

रेल्वे स्थानकावर उतरलेल्या नोकरदारांना बाहेर पडणेही कठीण झाले होते. आंदोलकांमुळे सकाळी गर्दीच्यावेळी रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. नोकरदारांना कार्यालय गाठण्यासाठी टॅक्सीही मिळत नव्हती. परिणामी, अनेकांना वेळेवर कार्यालयात पोहोचता आले नाही, तर काहींना पायीच कार्यालयात जावे लागले. 

वाहनांच्या रांगा, बेस्ट बस विलंबाने
जे. जे. फ्लायओव्हर, भायखळा, तसेच दादरकडे जाणारे रस्ते आणि क्रॉस मैदानाजवळील मार्गांवर वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या होत्या. बेस्ट बस वाहतूक अत्यंत उशिराने सुरू होती. अनेक बस मार्गातच अडकल्या होत्या. रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी होती. संपूर्ण सीएसएमटी परिसराचा ताबा आंदोलकांनी घेतल्याचे चित्र होते.

बसचे मार्ग बदलले प्रवाशांना त्रास  
सीएसएमटी स्थानकाबाहेरील मुख्य रस्ता बंद होता. पर्यायी मार्गाने मंदगतीने वाहतूक सुरू होती. डी. एन. रोड बंद केल्याने नोकरदारांचे हाल झाले. जे. जे. पुलावरून आलेली वाहतूक पोलिस आयुक्तालयामार्गे मेट्रो सिनेमाकडे वळविली. अनेक बेस्ट बसचे मार्ग बदलले होते. त्यामुळे नोकरदारांची चिडचिड झाली. 

फलाटावरच काढली रात्र 
आंदोलक रात्री सीएसएमटी स्थानकावरच झोपले होते. त्यांनी सकाळचा नाष्टा देखील तेथेच केला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर उतरून कामावर जाणाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होत होता. या परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांकडून सातत्याने आंदोलकांना खाली बसण्याचे आवाहन करण्यात येत होते. 

‘कामा’तील महिला रुग्णांचे हाल
सीएसएमटी स्थानकाजवळच्या कामा रुग्णालयात अनेक महिला रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ये-जा करताना आंदोलकाच्या वर्दळीमुळे त्रास झाल्याचे चित्र होते. मुंबई पाहण्याच्या पर्यटकांच्याही उत्साहावर पाणी फेरले गेले.

Web Title: Mumbai: Major traffic jam in Mumbai; Employees face difficulties while reaching office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.