शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:11 AM2018-07-23T11:11:22+5:302018-07-23T11:34:20+5:30

मरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला मोठा हार

Mumbai International airport name to be changed to Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी

शिवरायांच्या नावापुढे 'महाराज' हवेच, वॉच डॉग फाउंडेशनची गांधीगिरी

Next

मनोहर कुंभेजकर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख जवळजवळ सर्वच राजकीय नेते करत असतात. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या अंधेरी पूर्व सहार येथील विमानतळाचे नामकरण सध्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ असे आहे. विमान लँडिंग होताना देखील हवाई सुंदरी देखील 'अभ हम छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअर पोर्टपर किंवा डोमेस्टिक टर्मिनल्स पर लॅन्ड हो चुके है' अशी सूचना प्रवाशांना करते. मात्र यामध्ये महाराज या उपाधीचा उल्लेखच नसतो. या नामरणात महाराज ही उपाधी टाकण्याचे अध्यादेश केंद्र सरकारच्या विमान उड्डाण मंत्रालयाने काढले नसून हा महाराज उपाधीचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. या नामकरणासाठी वॉच डॉग फाउंडेशन या संस्थेने गेली अनेक वर्षे लढा दिला असून लोकमतने सातत्याने हा प्रश्न मांडला आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ या सध्याच्या नावात महाराज उपाधी लवकर लावण्यात यावी या मागणीसाठी वॉच डॉग फाउंडेशन या संस्थेचे संचालक अँड.ग्राडफे पिमेटा व निकलोस अल्मेडा आणि सहार गावातील सुमारे 100 शिवप्रेमींनी गांधीगिरी करत नुकताच मोठा हार अंधेरी पूर्व मरोळ येथील वेअर हाऊस जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घातला अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय  विमानतळ असे नामकरण करण्यासाठी आणि यामध्ये नसलेला महाराज हा शब्द निर्देशित करावा या मागणीसाठी वॉच डॉग फाउंडेशनने गेल्या 4 मे रोजी विलेपार्ले पश्चिम दुर्तगती महामागावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाहेर 20 फूटी मोठा बॅनर झळकवून  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अनोखे आंदोलन केले होते.

सहार येथील विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यासाठी 9 ऑगस्ट 1990 साली शिवसेना व भाजपा युतीच्या 30 आमदार व खासदारांनी व या दोन्ही पक्षांच्या 2000 कार्यकर्त्यांनी हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे घेऊन अंधेरी पूर्व लीला पेंटा हॉटेल ते सहार आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भव्य मोर्चा काढला होता. यामध्ये लोकनेते स्व.गोपनाथ मुंडे, माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ देखील सहभागी झाले होते. सहार येथील शिवप्रेमी गावकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात भाग घेतल्याबद्धल आपल्यासह 2000 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती अशी माहिती अल्मेडा यांनी दिली.

नामकरण आंदोलनानंतर  9 ऑगस्ट 1990 ते 31 मार्च 1999 पर्यंत सहार पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेले होते. या दोन्ही पुतळ्यांची मालकी शिवप्रेमी म्हणून आपल्याकडे द्यावी यासाठी 28 डिसेंबर 1998 साली अंधेरी येथील कोर्टात केलेली मागणी न्यायमूर्तींनी फेटाळून लावली अशी माहिती पिमेटा व अल्मेडा यांनी लोकमतला दिली. त्यानंतर आपण या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांनी पण आमची मागणी अमान्य केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात आपण परत न्यायमूर्ती परकार व न्यायमूर्ती पंड्या यांच्या खंडपीठाकडे जनहित याचिका दाखल केली होती.आपल्या याचिकांची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 31 मार्च 1999 साली या विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय असे नामकरण केले. 2004 साली येथे 9 वर्षे सहार पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेला पूतळा बसवण्यात आला. मात्र 2006 साली या विमानतळाची जबाबदारी जिव्हीके कंपनीने घेतली आणि आजपर्यंत या दोन्ही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळ आहे, मात्र यामधून महाराज हा शब्दच टाकण्यात आलेला नाही याबद्धल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि महाराज ही उपाधी येथील विमातळाच्या नावात गेली 12 वर्षे झाली आता तरी टाकावी असे ना राज्यकर्त्यांना वाटले ना जिव्हीके कंपनीला वाटले याबद्धल त्यांनी खंत व्यक्त केली.

२०१२ साली सहार येथील विमानतळाच्या नुतनीकरणासाठी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा मरोळ पाईपलाईन जवळील वेअरहाऊसमध्ये हलवण्यात आला. तर 2015 मध्ये विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम दुर्तगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली. गेली 3 वर्षे येथे शिवजयंती साजरी केली जाते. मात्र महाराज हा चार अक्षरी खूप महत्वाचा असलेला शब्द येथे या दोन्ही विमानतळात टाकण्याची इच्छा सत्ताधारी शिवसेना व भाजपाला होत नसल्याबद्धल त्यांनी खंत व्यक्त केली. गेली 28 वर्षे या विमातळाच्या नामकरणासाठी अँड. ग्राडफे पिमेटा व निकलोस अल्मेडा आणि सहारगावातील शिवप्रेमी लढा देत आहे.

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचे नामकरण नुकतेच प्रभादेवी असे करण्यात आले असून अन्य सात रेल्वे स्थानकांचे भविष्यात नामकरण होणार आहे. सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असतांना व्हीटी रेल्वे स्थानकाचे  नामकरण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असे करण्यात आले होते. आता अरबी समुद्रात भराव टाकून 300 एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय व जगातील सर्वात मोठे भव्य असे स्मारक उभे राहणार आहे. नागपूर येथील नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या  उंचीवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधी टाकण्यासाठी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील खासदार गजानन कीर्तिकर व उत्तर मध्य मुंबईतील खासदार पूनम महाजन आणि मुंबईतील उर्वरित सर्व खासदारांनी सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा अशी आग्रही मागणी केली आहे. जर केंद्र सरकारने या विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण येत्या 8 दिवसात न केल्यास वॉच डॉग फाउंडेशन व त्यांचे कार्यकर्ते हे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळासमोरील 5 एकर जागेत लंडनच्या ट्रफलगार स्केवरप्रमाणे भव्य पुतळा उभारण्यात यावा. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग व वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्यात येऊन आठवड्यातून एकदा त्यांना हार घालण्यात यावा. जिव्हीके कंपनी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तळघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक संग्रहालय उभारावे अशी मागणी अँड. ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.
 

Web Title: Mumbai International airport name to be changed to Chhatrapati Shivaji Maharaj International Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.