Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:34 IST2025-12-02T12:33:26+5:302025-12-02T12:34:24+5:30
अंधेरी पश्चिम येथील डी-मार्टसमोर असलेल्या सती प्रसाद सोसायटीत रघुवीर आपल्या कुटुंबासमवेत राहतो. जीप वेगात येत असल्याचे पाहून रघुवीर कुंभारने १५ वर्षीय मैत्रिण गौरी साटेलकर हिला बाजूला ढकलले, पण...

Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
पोलिस जीपच्या धडकेपासून २० वर्षीय आयटीआयचा विद्यार्थी रघुवीर प्रल्हाद कुंभार याने आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवला आहे. विले पार्ले पश्चिमेत रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. जीप वेगात येत असल्याचे पाहून रघुवीर कुंभारने १५ वर्षीय मैत्रिण गौरी साटेलकर हिला बाजूला ढकलले, मात्र, पुढच्याच क्षणी जीप रघुवीरवर आदळल्याने तो जखमी झाला. ही जीप एक पोलिस शिपाई मद्यधुंद अवस्थेत चालवत होता, असा आरोप कुंभार कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे. विले पार्ले पोलिसांनी शिपायाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
अंधेरी पश्चिम येथील डी-मार्टसमोर असलेल्या सती प्रसाद सोसायटीत रघुवीर आपल्या कुटुंबासमवेत राहतो. या अपघातात त्याच्या छातीला, पायांना आणि हाताला दुखापत झाली आहे. रघुवीरच्या कुटुंबीयांच्या म्हणल्यानुसार, शिपाई पूर्णपणे मद्यधुंद होता आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला आहे.
गौरी आणि रघुवीर निघाले होते घरी
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १२:३५ वाजता रघुवीर आणि शेजारी गौरी साटेलकर अन्य एका मित्रासोबत फेरफटका मारून शहाजीराजे रोडने घरी परतत होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या पोलिस जीपने धड़क दिली.
गाडी येऊन धडकली
अपघाताविषयी बोलताना रघुवीर म्हणाला, 'जेवण करून आम्ही फिरायला गेलो होतो. चालत असताना समोरून एक पोलिस व्हॅन प्रचंड वेगात येताना दिसली. मी लगेच गौरीला बाजूला ढकलले, पण गाडी सरळ माझ्यावर आदळली. माझ्या छातीला, पायांना, हाताला आणि मांड्यांना दुखापत झाली.
पोलिस शिपायाने जखमीला मदत न करताच घटनास्थळावरून पळ काढला, असे रघुवीरचे म्हणणे आहे. पोलिस शिपाई चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.