GSB Ganpati : 14 फुटी मूर्तीला परवानगी द्या; जीएसबी सेवा मंडळाची राज्य सरकारकडे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 23:47 IST2020-07-04T23:39:09+5:302020-07-04T23:47:59+5:30
जीएसबी सेवा मंडळाची गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असते. ही मूर्ती गेल्या 65 वर्षांपासून मंडपातच साकारली जाते.

GSB Ganpati : 14 फुटी मूर्तीला परवानगी द्या; जीएसबी सेवा मंडळाची राज्य सरकारकडे विनंती
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसेच, फक्त 3 ते 4 फुटापर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले आहे. मात्र, वडाळ्यातील सुप्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाने गणेशोत्सवादरम्यान आपल्या मूर्तीची उंची 14 फूट कायम ठेवण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.
जीएसबी सेवा मंडळाची गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असते. ही मूर्ती गेल्या 65 वर्षांपासून मंडपातच साकारली जाते. तसेच, मंडपातच कृत्रिम तलाव तयार करून तिथेच विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणूक काढली जात नाही. त्यामुळे गणेश मूर्तीवर उंचीचे बंधन घालण्यात येऊ नये, असे मंडळाचे म्हणणे आहे.
यंदा 22 ते 26 ऑगस्टपर्यंत उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे बंधनकारक, स्वच्छता आणि इतर निकषांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळाने म्हटले आहे. याशिवाय, भाविकांना मंडपाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. तर सेवेदारांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे घरपोच प्रसाद वाटप करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा मूर्तीची स्थापना करण्याऐवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची प्राण प्रतिष्ठापना यंदा मंडळाच्या देव्हार्यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीने करण्यात येणार आहे.
आणखी बातम्या ....
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...
कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर
आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर
नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स