Join us

Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 10:04 IST

Mumbai fire news: दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या एका कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमुळे वरच्या मजल्यावर १९ लोक अडकले होते. 

Mumbai fire news today: पाच मजली इमारतीत असलेल्या एका कपड्याच्या शोरुममध्ये आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या दुकानातील आगीमुळे पहाटेच मोठा गोंधळ झाला. धुराचे लोट वरच्या मजल्यांवरील घरात आणि परिसरातील घरात गेल्याने नागरिक घाबरून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या पाठवण्यात आल्या. आग नियंत्रणात आणून वरच्या मजल्यावर अडकलेल्या १९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) पहाटे ६.३० वाजता अग्निशामक दलाच्या कार्यालयात कॉल आला. त्यानंतर दोन-तीन मिनिटात अग्निशामक दलाचे जवान बंबांसह दाखल झाले. ही आग सकाळी ८.१० वाजता आटोक्यात आणण्यात यश आले. 

वाचा >>ई-बाइक टॅक्सीला संघटनांकडून तीव्र विरोध; निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा 

पेडर रोड भागातील नाना चौकात जसलोक हॉस्पिटल जवळ पाच मजली इमारती आहे. याच इमारतीत असलेल्या लिबास रियाज गांगजी या कपड्याच्या शोरुममध्ये ही आग लागली होती. तळमजल्यावर असलेल्या शोरुममध्ये आग लागल्यानंतर धुराचे मोठ मोठे लोट निघू लागले. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. 

वाहनांची नेहमी वर्दळ असलेल्या या रस्त्यावरील वाहतूक त्यामुळे काही तासांसाठी दुसऱ्या मार्गावरून वळण्यात आली होती. 

लहान मुले, श्वानांसह अडकले १९ जण

'सुरूवातीला आग लेव्हल १ म्हणून जाहीर करण्यात आले होते. पण, शोरुमचा आकार आणि वरच्या मजल्यांवर १९ लोक अडकलेले असल्याने लेव्हल २ जाहीर करण्यात आली. आम्ही शोरुमचा दरवाजा तोडला आणि आत शिरलो. त्यानंतर आग विझवण्यात आली. वरच्या मजल्यावर पाळीव प्राण्यासह कुटुंब, लहान मुले असे १९ जण अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही', अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिली. 

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, 'शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. सकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. लोक त्यांच्या त्यांच्या घरी जात आहे. लिफ्ट आणि विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेला नाही. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुणीही जखमी झाले नाहीत. मी यासंदर्भात अग्निशामक दल आणि महापालिकेला योग्य कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत.' 

टॅग्स :आगअग्निशमन दलअपघातमंगलप्रभात लोढा