Mumbai Crime Latest News: सगळ्याचं जेवण झालं. घरातील सगळे माळ्यावर झोपायला गेले. पत्नीने रात्री उठून बघितले तेव्हा ते झोपलेले होते. पण, सकाळी उठून बघितले तेव्हा पतीचा मृतदेह साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य बघून कुटुंबातील सगळ्यांनीच टाहो फोडला. ही घटना घडली आहे मुंबईतील विक्रोळीमध्ये! मुंबई वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने लोखंडी जिन्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शंकर सोळसे असे आत्महत्या केलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. मंगळवारी (१५ जुलै) पहाटे त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने का केली आत्महत्या?
शंकर सोळसे हे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत कायर्रत होते. दीड वर्षापूर्वी आझाद मैदान वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांना पायावर उभे राहण्यास त्रास सुरू झाला होता.
वाचा >>हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
पायावर उभे राहता येत नाही, यामुळे ते नैराश्यात होते. पायाच्या त्रासामुळे त्यांनी स्वतःची बदली विक्रोळी वाहतूक विभागात करून घेतली होती. पायाच्या त्रासामुळे त्यांना ऑफिसमध्येच काम दिले गेले होते. पण, तरीही ते या त्रासामुळे तणावात होते.
कुटुंबातील सगळे झोपलेले असताना घेतला गळफास
सोळसे हे विक्रोळीतील विक्रोळी पार्कसाईटजवळील वर्षानगर येथे कुटुंबासह राहत होते. सोमवारी रात्री सगळे कुटुंबीय जेवणानंतर झोपले होते. सोळसे हे घरात खालच्या खोलीत झोपले होते, तर कुटुंबातील इतर जण माळ्यावर झोपले होते. रात्री दोन वाजता त्यांच्या पत्नीने खाली बघितले तेव्हा ते झोपले होते.
पहाटे उठल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जेव्हा बघितले तेव्हा सोळसे यांचा मृतदेह लोखंडी जिन्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला होता. एका शेजाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.