Join us
Daily Top 2Weekly Top 5

काम करा अन्यथा चालते व्हा, नितेश राणेंचा पालिका आयुक्तांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 13:15 IST

चांगल्या पदाच्या हट्टापायी अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे

मुंबई - गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ झालेल्या पादचारी पुलाच्या दुर्घटनेवरुन आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला आहे. ज्या वेळी अजॉय मेहता यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली राहिली, मात्र आता मेहता यांची कारकीर्द संपुष्टात येत आहे. चांगल्या पदाच्या हट्टापायी मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. 

मुंबईत घडलेल्या दुर्घटनेला महापालिका जबाबदार धरत नितेश राणेंनी आयुक्त अजॉय मेहता यांना टीकेचं लक्ष्य केलं. नितेश राणे म्हणाले की, चांगल्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहणारे अजॉय मेहता मुंबईकरांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मेहतांना फक्त चांगल्या पदाची अपेक्षा आहे त्यामुळे महापालिका प्रशासन कारभाराकडे ते लक्ष देत नसून मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभाराला अजॉय मेहताच जबाबदार आहेत. मेहता यांनी चांगलं काम करावं अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा असं नितेश राणेंनी सांगितले.

याच मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले आहे. पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही ?, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेला मनुष्यजीवाची काहीच किंमत नाही काय, असा टोलाही नितेश राणेंनी पालिकेच्या आडून शिवसेनेला लगावला आहे.

कमला मिल, एलफिन्स्टन ब्रिज आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान अनेकदा छोट्या अधिकाऱ्यांचेच बळी दिले जातात. त्यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांना जबाबदार का धरलं जातं नाही. तसेच महापौरांना राजीनामा का द्यायला सांगत नाहीत, असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान मुंबईत पुल कोसळण्याच्या घटनेची सविस्तर चौकशी तर होईलच. पण, आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

 

 

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनामुंबईनीतेश राणे उद्धव ठाकरेनाईटलाईफ