मुंबई : आयआयटी-मुंबईच्या वसतिगृहात रात्री उशिरा दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी एका विद्यार्थ्यांच्या खोलीतून ७.६५ मिमीची पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पवई पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.
१९ फेब्रुवारीच्या पहाटे पैशांच्या वादातून दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच संस्थेच्या क्वीक रिस्पॉन्स टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रूम क्रमांक ९३ मधील प्रथम वर्ष बीटेकच्या विद्यार्थ्याला आणि रूम क्रमांक ८९ मधील दुसऱ्या विद्यार्थ्याला ओळखले.
वाद शांत झाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना रूम क्रमांक ९३ मधील विद्यार्थी आणि त्याचा मित्र अपूर्व मिश्रा मद्यप्राशन केल्याचे समोर येताच दोघांच्या खोल्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान रूम क्रमांक ९३ मधील काळ्या पिशवीतून 'के एफ ७.६५' अशी खूण असलेली पाच जिवंत काडतुसे आढळून आली. या काडतुसांची किंमत अंदाजे ३,५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान रूम क्रमांक ९३ मधील विद्याथ्यनि संबंधित पिशवी त्याचा मित्र अपूर्व मिश्रा याची असल्याचा दावा केला. मिश्रा हा त्याच वसतिगृहातील रूम क्रमांक ११५ मध्ये राहत असल्याचे सांगण्यात आले.
मित्रांना दाखवण्यासाठी काडतूस ठेवल्याचा दावा
मिश्राने पोलिसांना सांगितले की, त्याने ही काडतुसे केवळ मित्रांना दाखवण्यासाठी ठेवली होती. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून यामागील त्याचा नेमका हेतू तपासला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
बिहार कनेक्शन समोर
मिश्राच्या चौकशीत त्याचा समस्तीपूरमधील मित्र सर्वोत्तम आनंद चौधरी याचे नाव समोर आले. मिश्राने सांगितले की, चौधरी १२ फेब्रुवारी रोजी कॅम्पसवर आला होता आणि त्यानेच ही काडतुसे तिथे ठेवली होती.
पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी चौधरी पुन्हा कॅम्पसमध्ये येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत त्याने बिहारमधील मुंगेर येथून ही काडतुसे खरेदी केल्याची कबुली दिली. आयआयटी-मुंबईचे सुरक्षा कर्मचारी अमोद करंजे (४९) यांनी जप्त केलेली काडतुसे पवई पोलिस ठाण्यात जमा केली.
त्यानंतर चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौधरीला शुक्रवारी अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आयआयटी प्रशासन काय म्हणते?
ही काडतुसे वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कॅम्पसमध्ये आणली होती, वसतिगृहात कोणतेही शस्त्र सापडले नाही, असे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे.
आयआयटी मुंबईचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आणि काडतुसे घेऊन आलेला विद्यार्थी हे दोघे बालपणीचे मित्र असून याप्रकरणी अंतर्गत तपासणी केल्यानंतर आयआयटी मुंबईतील सुरक्षा रक्षकांनी हे प्रकरण पोलिसांकडे सुपूर्द केले आहे, अशी माहिती आयआयटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
Web Summary : Five live cartridges were found in an IIT-Mumbai hostel room after a student dispute. A visitor from Bihar allegedly brought them, leading to his arrest. Police are investigating.
Web Summary : आईआईटी-मुंबई के छात्रावास के कमरे में छात्रों के विवाद के बाद पांच जिंदा कारतूस मिले। बिहार से आए एक व्यक्ति पर लाने का आरोप, गिरफ्तारी। पुलिस जांच कर रही है।