Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:30 IST2025-07-01T15:27:37+5:302025-07-01T15:30:26+5:30
Malad Man Rapes Women: मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालाड पूर्व भागात एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

Representative Image
मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालाड पूर्व भागात एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शिवाय, अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून रोख रक्कम आणि दागिने लुबाडल्याचा पीडितेने आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने तिच्या पतीला फोन चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच आरोपीने पीडितेला त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्यास तिच्या पतीला आणखी त्रास सहन करावा लागले, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मालाड पूर्व येथे भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून रोख पैसे आणि मौल्यवान वस्तू घेतल्या. पीडित महिला न सांगता घरातून पैसे घेऊन जात असल्याचे तिच्या पतीच्या लक्षात आले. पीडितेच्या पतीने विचारपूस केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पीडिता आणि तिच्या पतीने ताबडतोब जवळचे पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून रोख दोन लाख रुपये आणि दागिने लुटले. आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.