Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:02 IST2025-09-19T09:58:38+5:302025-09-19T10:02:55+5:30
Mumbai crime news in marathi: मुंबईतील नेहमी वर्दळ असणाऱ्या घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासात व्यक्तीचा मृत्यू कोणामुळे झाला, हे समोर आले आहे.

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
Mumbai Crime Latest News: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील जुन्या तिकीट घराजवळ ही व्यक्ती पायाऱ्यांजवळ झोपली होती. जेसीबीची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मयत व्यक्तीजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याने ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी जेसीबी चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल दाखल केला आहे.
मध्यरात्री नक्की काय घडलं?
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठी पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले की, "एका प्रत्यक्षदर्शीने याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. एका जेसीबीने झोपलेल्या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर जेसीबी चालक भांडुपच्या दिशेने पळून गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीलाही झालेल्या घटनेची माहिती दिली आणि घरातून फरार झाला. त्याने मोबाईल बंद केलेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत."
जेबीसी न्यायला आला अन् अपघात झाला
पोलिसांनी सांगितले की, घाटकोपर रेल्वे स्थानकावरील जुने तिकीट घर पाडण्यात येऊन तिथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी जेबीसी उभा करण्यात आला होता. त्याच्या बाजूलाच पायऱ्यांजवळ मयत व्यक्ती झोपलेली होती.
जेसीबी घेण्यासाठी आलेल्या चालकाला झोपलेली व्यक्ती दिसली नाही. आरोपीवर चढला आणि जेसीबी सुरू केला. जेबीसी मागे पुढे नेल्यानंतर आवाज आला. त्यामुळे कशाला तरी धडक बसल्याचे आरोपीच्या लक्षात आले. त्यानंतर आरोपी जेबीसीतून खाली उतरला आणि त्याने बघितले. तेव्हा मयत व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली होती. त्याला बघून तो घाबरला आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला.
नंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला.