संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षण परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीची अभिमानास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 07:44 PM2018-07-29T19:44:03+5:302018-07-29T19:44:26+5:30

स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत (UNCTAD) भारतातील एखाद्या स्वयंसेवी  संस्थेने ग्राहक संरक्षणासाठी कायमस्वरुपी देखरेख यंत्रणा निर्माण करुन दाखवली आहे  हे आज भारतातील किती जणांना माहीत आहे? मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेने ही अलौकिक आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

Mumbai Consumer Panchayat's proud performance in the United Nations Consumer Protection Conference | संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षण परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीची अभिमानास्पद कामगिरी

संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षण परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीची अभिमानास्पद कामगिरी

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत (UNCTAD) भारतातील एखाद्या स्वयंसेवी  संस्थेने ग्राहक संरक्षणासाठी कायमस्वरुपी देखरेख यंत्रणा निर्माण करुन दाखवली आहे  हे आज भारतातील किती जणांना माहीत आहे? मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेने ही अलौकिक आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

 ९-१० जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षण विषयक तिसर्या वार्षिक परिषदेत सहभागी होऊन परतलेले मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष व या कायमस्वरुपी देखरेख यंत्रेणेचे शिल्पकार शिरीष देशपांडे यांनी 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना याबाबत सविस्तर  माहिती दिली.

२०१६ पासून दरवर्षी UNCTAD तर्फे आयोजित केल्या  जात असलेल्या या वार्षिक ग्राहक संरक्षण परिषदेची मूळ कल्पना मुंबई ग्राहक पंचायतीची.  ही कल्पना सर्वप्रथम २०१२ साली शिरीष देशपांडे यांनी लंडन-स्थित 'कंझ्युमर्स इंटरनेशनल' च्या संचालक मंडळावर  निवडून गेल्यावर मांडली व त्यानंतर UNCTAD च्या व्यासपीठावर जिनिव्हा येथे मांडली होती. संयुक्त राष्ट्रांच्या १९८५ मधे अस्तित्वात आलेल्या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांमधे बदलत्या कालानुरुप सुधारणा करण्याचा आग्रह शिरीष देशपांडे यांनी धरला होता. तसेच या सुधारीत मार्गदर्शक तत्वांची संयुक्त राष्ट्रांतील सर्व सदस्य राष्ट्रे व्यवस्थित अंमलबजावणी करत आहेत का हे बघण्यासाठी एक कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा हवी असाही देशपांडे यांचा आग्रह होता. यावर जिनीव्हा येथे सतत तीन वर्षे सविस्तर चर्चा झाल्या. त्यात या मार्गदर्शक तत्वांत अनेक सुधारणा करण्याचे सर्व सहमतीने मान्य करण्यात आले. परंतु मुंबई ग्राहक पंचायतीच्या कायम स्वरुपी देखरेख यंत्रणेच्या सुचनेला अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इ. प्रगत राष्ट्रांनी शेवटपर्यंत विरोध केला.
 परंतु ग्राहक पंचायतीने चिकाटीने, भारत सरकारच्या ग्राहक मंत्रालयाच्या आणि ब्राझिल व अन्य विकसनशील देशांच्या मिळवलेल्या पाठिंब्यामुळे सरतेशेवटी मुंबई ग्राहक पंचायतीचा  हा बहुचर्चित कायमस्वरुपी देखरेख यंत्रणेचा प्रस्ताव   UNCTAD  च्या गळी उतरवलाच व संयुक्त राष्टांच्या आम सभेने ( UN General Assembly ने) २२डिसेंबर २०१५ रोजी यावर शिक्कामोर्तबही  केले.  हा एक मोठा दुर्मीळ जागतिक व ऐतिहासिक विजय आहे  अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड. शिरीष देशपांडे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.

मुंबई ग्राहक पंचायतीच्या या प्रस्तावानुसार २०१६ पासुन दर वर्षी जुलैमधे जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश या दोन- दिवसीय ग्राहक संरक्षण परिषदेत उत्साहाने सहभागी होत आहेत. ज्या प्रगत राष्ट्रांनी या कल्पनेला विरोध केला होता तीच मंडळी आज या देखरेख यंत्रणेचं तोंड भरुन कौतुक करताना दिसतायत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी विविध राष्ट्रे कशी करत आहेत , त्यात या राष्ट्रांना , विशेषत: विकसनशील व अविकसित राष्ट्रांना , काही साहाय्य/मार्गदर्शन/सल्ला हवा असल्यास तो देणे तसेच विविध राष्ट्रे आपापल्या ठिकाणी ग्राहक संरक्षणाबाबत काही चांगले उपक्रम राबवत असतील तर त्याबाबत माहितीचे आदान प्रदान करणे हा या देखरेख यंत्रणेच्या परिषदेचा मूळ उद्देश असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

 दरवर्षी जुलैमध्ये २ दिवसांची ही परिषद UNCTAD तर्फे आयोजित केली जाते .या परिषदेला संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या सर्व देशांच्या ग्राहक संरक्षणासंबंधित शासकीय प्रतिनिधींची उपस्थिती  असते . ग्राहक संस्थांची उपस्थिती इथे फारच तुरळक असते. कंझ्युमर्स इंटरनँशनल, मुंबई ग्राहक पंचायत व जयपूर येथील  CUTS या ग्राहक संस्थांचे प्रतिनिधीच या परिषदांना उपस्थित असतात.
 
या वर्षीच्या या दोन दिवसीय परिषदेत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चासत्रे  झाली. ग्राहकांचे आर्थिक संरक्षण, तक्रार निवारण व उत्पादन सुरक्षितता
या तिन्ही विषयांत जगातील प्रगत व विकसनशील देशात कोणते कायदे व धोरणे अस्तित्वात आहेत,  अविकसित देशांना याबाबतीत साहाय्य करून तेथील ग्राहकांचेसुद्धा सक्षमीकरण कसे करता येईल  याबाबत चर्चा झाली. तसेच इ कॉमर्स या महत्वाच्या विषयावरील अभ्यास व संशोधन पुढील वर्षापर्यंत चालू ठेवण्याचेही ठरवण्यात आले,  अशी माहिती त्यांनी दिली.

महारेराचे  'सलोखा मंच' UNCTAD च्या व्यासपीठावर:

जिनीव्हा येथील यंदाच्या परिषदेत 'तक्रार निवारण'  या सत्रात देशोदेशीच्या प्रस्थापित तक्रार निवारणाच्या खर्चिक व वेळकाढू न्यायालयीन यंत्रणा व पर्यायी विवाद सोडवणूक (Alternate Dispute Resolution -ADR ) यंत्रणा यावर अनेक देशांतील तज्ञांनी या क्षेत्रातील उत्तम प्रथांचा वेध घेतला .या सत्रात अँड.शिरीष देशपांडे यांनी रेरा कायद्याअंतर्गत ' महारेरा'  मधे 'सलोख मंचा'ची (Conciliation Fourm ) ची मुंबई ग्राहक पंचायतीने सुचवलेली अनोखी कल्पना प्रभावीपणे मांडून ती कशी यशस्वीपणे राबवत आहोत या बद्दल सादरीकरण केले.

मुळात Conciliation ही पर्यायी तक्रार यंत्रणा जगात अनेक देशांत राबवली जात आहे. परंतु या सर्व ठिकाणी समन्वयक म्हणून जी व्यक्ती विवादातील दोहोबाजूंमधे समन्वय/सलोखा घडवून आणते ती व्यक्ती स्वतंत्र व निष्पक्ष असणे आवश्यक असते. परंतू मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रयोग नेमका याच मुद्यावर अनोखा आहे.
महारेरा अंतर्गत सलोखा मंचात दोन समन्वयक असतात. हे दोन्ही प्रतिनिधी  स्वतंत्र व निष्पक्ष तर नसतातच. किंबहुना ते विवादातील दोन्ही बाजूंपैकी ऐकेकाचे प्रतिनिधित्व करून त्या त्या बाजूचे उघड उघड हितरक्षण करणारे प्रतिनिधीच असतात . जगात Conciliation चा असा हा  प्रयोग कुठे प्रत्यक्षात असल्याचे आपल्या तरी माहितीत नाही आणि नेमके यातच  'महारेरा ' च्या 'सलोखा मंचा'चे आगळेवेगळेपण आहे आणि ते आपण जगासमोर मांडू शकलो असे अँड.शिरीष देशपांडे यांनी अभिमानाने सांगितले.

 हे अनोखेपण UNCTAD च्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडतांना  या आगळ्या वेगळ्या सलोखा मंचाच्या यशस्वितेचे प्रमाण सुध्दा देशपांडे यांनी अधोरेखित केले. मुंबई व पुणे येथील ६५ पैकी ५३ प्रकरणात सामंजस्याने तंटे मिटले असून
 यशस्वितेचे प्रमाण हे ७९% होते. Conciliation मधे अग्रणी असलेल्या सिंगापूरचे यशस्वितेचे प्रमाण  सुध्दा ७५ ते ७८% असल्याचे वाचनात आले होते.
अशा प्रकारे सामंजस्य मंचात निष्पक्षपाती Conciliators ऐवजी दोन्ही बाजूंचे हित रक्षणारे प्रतिनिधी घेऊन मुंबई ग्राहक पंचायत व महारेरा ने Conciliators बाबतचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम तर बदललेच, पण त्याही पुढे जाऊन अशा प्रकारच्या नव्या व्यवस्थेद्वारेसुद्धा मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकते हे आपण जगाला दाखवून देऊ शकलो. हा एक नवा ऐतिहासिक पायंडा मुंबई ग्राहक पंचायतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर घालून दिला असून या विषयातील जागतिक तज्ञांना निश्र्चितच याची नोंद घ्यावी लागेल,  असा विश्वास देशपांडे यांनी  व्यक्त केला .

जिनिव्हातील या सत्रातील वरील चर्चेच्या निमित्ताने "Conciliation-A Unique Experiment by MahaRERA"  ही मुंबई ग्राहक पंचायतीची पुस्तिकाही UNCTAD ने त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करून ती सर्व जगाला उपलब्ध करून देऊन मुंबई ग्राहक पंचायतीच्या नवनिर्मितीचा जागतिक सन्मान  केला असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
 
मुंबई ग्राहक पंचायतीची संयुक्त राष्ट्राच्या एका व्यासपीठावरील ही ऐतिहासिक व कायमस्वरूपी कामगिरी सर्व भारतीयांना स्फूर्तिदायी व अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही  असा विश्वास शिरीष देशपांडे यांनी शेवटी व्यक्त केला.

Web Title: Mumbai Consumer Panchayat's proud performance in the United Nations Consumer Protection Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.