Join us

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 03:16 IST

वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध मुंबईतील अनेक नेत्यांनी तक्रारी करूनही निव्वळ मल्लिकार्जुन खरगे यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध मुंबईतील अनेक नेत्यांनी तक्रारी करूनही निव्वळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच चार-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस पक्ष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

गेल्या बुधवारी नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात मुंबईच्या विषयावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस हायकमांड राहुल गांधी यांच्यासह खरगे, वर्षा गायकवाड आणि अन्य काही नेते उपस्थित होते. मुंबईतील स्थानिक नेते आणि अनेक माजी आमदारांनी वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत लेखी तक्रारी केल्या आणि गायकवाड यांना अध्यक्ष पदावरून दूर करावे, अशी मागणी केली. 

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांनी मनमानी कारभार करत मुंबईतील काही मतदारसंघ काँग्रेस उमेदवार निवडून येण्याची शक्यता असतानाही उद्धव सेनेसाठी सोडले, धारावी मतदारसंघासाठी शिंदेसेनेशी तडजोड केली, उमेदवारांसाठी पक्षाने दिलेला पार्टी फंड उमेदवारांपर्यंत पोहोचवला नाही, तिकीट वाटपातही ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासण्यात आले, अशा काही गंभीर तक्रारींचा त्यात समावेश आहे. मात्र, स्थानिक नेते आणि माजी आमदारांच्या तक्रारींकडे डोळेझाक करत खरगे यांनी गायकवाड यांना पाठीशी घातले आणि त्यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवण्याचा आग्रह राहुल गांधी यांच्याकडे धरला. 

त्यावर राहुल गांधी यांनी आपापसातील भांडणे मिटवून महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी तंबी देत अभय दिले. त्यामुळे येणारी निवडणूक खा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली लढवण्यात येईल, हे जवळपास निश्चित झाले. मात्र, यामुळे महापालिका निवडणुकीत मात्र पक्षांतर्गत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका काँग्रेस नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबईबाबत रणनीती 

मुंबई महापालिकेच्या विषयावर दिल्लीत बैठक झाली. मात्र त्या बैठकीत कोणत्याही तक्रारीवर चर्चा झाली नाही. महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करून रणनीती ठरवण्यात आली. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्यावर सगळेच मेहनत घेत आहेत. 

गेल्या लोकसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीतही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेसमल्लिकार्जुन खर्गेराहुल गांधी