Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 22:13 IST

Mumbai Coastal Road Fire: शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज

Mumbai Coastal Road Fire: मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'मुंबई कोस्टल रोड'च्या उत्तरेच्या बाजूच्या रस्त्यावर (Northbound) बुधवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली असून, ती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडच्या बोगद्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव कोस्टल रोडचा उत्तर दिशेकडे जाणारा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

प्रशासनाची तत्परता

कोस्टल रोडवर आग लागताच मुंबई महानगरपालिका (BMC), अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने समन्वय साधत परिस्थिती हाताळली. बोगद्यातील धूर बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, संपूर्ण भागाची पाहणी केली जात आहे. जोपर्यंत तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त होत नाही आणि मार्ग सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत उत्तरवाहिनी सुरू केली जाणार नाही, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कोस्टल रोडच्या तांत्रिक देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर काही काळाने वाहतूक सुरळीत झाली.

वाहतुकीत मोठे बदल

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडवरून उत्तर मुंबईकडे (वांद्रे, अंधेरीच्या दिशेने) जाणाऱ्या वाहनांची वाहतूक आता पेडर रोडमार्गे हाजी अलीकडे वळवण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा मार्ग बंद झाल्याने दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पेडर रोड आणि हाजी अली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना संयम राखण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Coastal Road Entrance Engulfed in Fire; Traffic Disrupted, Commuters Stranded

Web Summary : A fire erupted at the Mumbai Coastal Road's northbound entrance due to a suspected short circuit, halting traffic. No casualties were reported. Authorities rerouted vehicles via Pedder Road and Haji Ali, causing congestion. Efforts are underway to restore normal traffic flow after the technical issue is resolved.
टॅग्स :मुंबईमुंबई कोस्टल रोडआगअग्निशमन दलवाहतूक कोंडी