पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडले, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:27 IST2019-03-17T08:22:17+5:302019-03-17T11:27:20+5:30
ग्रँटरोड येथील नाना चौकातील पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (16 मार्च) ही घटना घडली असून यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडले, एकाचा मृत्यू
मुंबई - ग्रँटरोड येथील नाना चौकातील पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (16 मार्च) ही घटना घडली असून यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या टाकीत पडलेल्या चार कामगारांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँटरोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील नाना चौकात शनिवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यावेळी पाच कामगार पाण्याच्या टाकीत पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन या पाचही कामगारांना रात्री टाकीतून बाहेर काढलं. उपचारासाठी पाचही कामगारांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान राकेश निजाब या कामगाराला मृत घोषित करण्यात आलं. तर उमेश पवार, शांताराम भाकटे, सुरेश पवार आणि बाळासाहेब भावरे या चार कामगारांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.