Mumbai: दहावी परीक्षेच्या ऐन तोंडावर ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न ऐरणीवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:43 IST2026-02-04T15:42:51+5:302026-02-04T15:43:58+5:30
५४ परीक्षा केंद्रांसाठी ५० लाख द्या; पालिकेचे शिक्षण उपसंचालकांना पत्र

Mumbai: दहावी परीक्षेच्या ऐन तोंडावर ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न ऐरणीवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ५४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचा आढावा घेण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत. संरक्षक भिंत, डेस्क-बेंच, स्वच्छतागृहे, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय सर्व परीक्षा केंद्रांवर असल्याची खातरजमा मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे. परीक्षा केंद्र परिसर व संबंधित वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत.
पालिकेच्या माध्यमिक विभागाकडे पुरेसा निधी नाही
मात्र, सीसीटीव्ही बसविण्यासाठी पालिकेच्या माध्यमिक विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे निधी शासनाकडून मिळावा, यासाठी शिक्षणाधिकारी खरे यांनी उपसंचालक कंकाळ यांना ३० जानेवारीला पत्र पाठविले आहे.
१,०१० कॅमेऱ्यांची आवश्यकता
मुंबईतील ५४ परीक्षा केंद्रांमध्ये ४७८ वर्गखोल्या वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्गखोलीत किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्याध्यापकांच्या खोलीत किमान एक कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. एकूण १,०१० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.