Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:14 IST2025-12-30T09:55:34+5:302025-12-30T10:14:09+5:30
Mumbai Bhandup Bus Accident Video: मुंबईतील भांडुप परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
Bhandup Bus Accident Video : मुंबईतील भांडुप परिसरात सोमवारी रात्री बसचा भीषण अपघात घडला. या अपघाताने संपूर्ण शहर हादरले. रात्री ९:३५ च्या सुमारास, भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका बेस्ट बसने नियंत्रण गमावले. यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीला बसने चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. १० जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळाजवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये बस गर्दीत घुसताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये एका साडीच्या दुकानाबाहेर गप्पा मारत असलेली लोक दिसत आहेत. अचानक, यावेळी एका वेगाने येणाऱ्या बेस्ट बसचे नियंत्रण सुटते आणि ती गर्दीला चिरडते.
फुटेजमध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी दुकानात धावत असल्याचे दिसत आहे. तर काहींना त्या बसची धडक बसली. या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला.
बसने १४ जणांना दिली धडक
पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात १४ पादचाऱ्यांना बसने धडक दिली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे.
बेस्ट बस अपघाताबाबत, डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हा अपघात बसच्या वेगामुळे, ब्रेक निकामी झाल्यामुळे की चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस वेगाने जात होती आणि अचानक नियंत्रण सुटले, यामुळे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. स्थानिक रहिवाशांनीही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले pic.twitter.com/n5wictgTE1
— Lokmat (@lokmat) December 30, 2025