मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:54 IST2025-06-13T16:53:37+5:302025-06-13T16:54:08+5:30

कांदिवली पूर्व येथील जानुपाडा येथे हा प्रकार घडला. पालकमंत्री आशिष शेलार हे जानुपाडा येथील रहिवासी, पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते.

Mumbai BJP office bearers clash in front of Ashish Shelar car, a fight broke out between two groups at Kandivali | मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात मुंबई भाजपा अध्यक्ष सातत्याने शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत आहे परंतु शुक्रवारी मुंबई भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. कांदिवली येथे आशिष शेलारांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. या बैठकीपूर्वीच भाजपातील २ गटात तणावाची स्थिती निर्माण झाले आणि शेलारांसमोरच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

कांदिवली पूर्व येथील जानुपाडा येथे हा प्रकार घडला. पालकमंत्री आशिष शेलार हे जानुपाडा येथील रहिवासी, पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. जानुपाडा येथील रहिवाशी सध्या वनजमिनीच्या मालकी वादावरून अडचणीत आहे. ही वनजमीन आहे की नाही या द्विधा मनस्थितीमुळे इथल्या लोकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाही. या लोकांची भेट शेलार घ्यायला आले होते. यावेळी भाजपाच्या स्थानिक २ गटामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आशिष शेलार यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 

शेलारांच्या कारसमोरच कार्यकर्ते एकमेकांना मारत होते. हा संपूर्ण वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यात दखल घेतली आणि वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रकारामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसून आले. या घटनेतील एका पदाधिकाऱ्याने हा आमच्या पक्षातील वाद असून वरिष्ठ याची योग्य ते दखल घेतील. आता आम्ही मेडिकल चाचणीसाठी चाललो आहोत. त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील कार्यवाही करू असं म्हटलं आहे.

मुरबाडमध्येही १० पैकी ९ नगरसेवकांनी सोडली पक्षाची साथ

अलीकडेच मुरबाड नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष निवडणुकीवरून भाजपात मतभेद पाहायला मिळाले. या निवडणुकीत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा उमेदवार दिला त्याला विरोध करत भाजपाच्या १० पैकी ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या निर्णयाविरोधात अपक्ष उमेदवाराला मतदान केल्याचे समोर आले. 

Web Title: Mumbai BJP office bearers clash in front of Ashish Shelar car, a fight broke out between two groups at Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.