BEST: फुकट्या प्रवाशांना ‘बेस्ट’चा दणका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:23 IST2025-06-16T16:22:22+5:302025-06-16T16:23:49+5:30
वर्षभरात ९,८४८ प्रवाशांकडून ५.४७ लाख वसूल; तिकीट काढून प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

BEST: फुकट्या प्रवाशांना ‘बेस्ट’चा दणका!
मुंबई : तिकीट तपासनीसांची कमतरता, विनावाहक बससाठी नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची वाढतच आहे. १ एप्रिल २०२४ ते १ मे २०२५ दरम्यान ‘बेस्ट’ने ९,८४८ फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारत पाच लाख ४७ हजारांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, आरामदायी, सुरक्षित प्रवास आणि स्वस्त प्रवास असलेल्या बेस्ट बसमधून तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन ‘बेस्ट’ने प्रवाशांना केले.
बेस्ट बसमधून दररोज ३० ते ३२ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवास म्हणून बेस्टकडे पहिले जात असताना दुसऱ्या बाजुला याच गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. अनेकदा गर्दीत विनातिकीट प्रवासी हात दाखवून ‘पास’ असे सांगत निसटण्याचा प्रयत्न करतात. परिणामी फुकट्या प्रवाशांमुळे ‘बेस्ट’ला तोटा सहन करावा लागतो.
विनावाहक बसमध्ये गैरफायदा
‘बेस्ट’ने ऑक्टोबर २०१९ मध्ये विनावाहक बस सुरू केल्या. या बसमध्ये वाहक नसतो. बस थांब्यावरच उभे असलेले वाहक प्रवाशांना तिकीट देतात. गर्दीच्या वेळी काही प्रवासी मधल्या थांब्यांवरून बसमधून विनातिकीट प्रवास करतात. तर, काही वेळा बस थांब्यावरच तिकीट देण्यासाठी वाहक नसतो.
असा आहे दंड
सध्या ‘बेस्ट’कडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे, तसेच प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येतो. दंड भरण्यास नकार दिल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६० (ह) अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे.