मुंबई मराठी माणसाची, महापालिकेत मोदींच्या घोषणा कशाला? संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:58 IST2026-02-12T11:51:18+5:302026-02-12T11:58:43+5:30
महापालिकेत महापौर निवडीवरुन झालेल्या राड्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला सुनावले.

मुंबई मराठी माणसाची, महापालिकेत मोदींच्या घोषणा कशाला? संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sanjay Raut: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर नवीन कारभारी मिळाले आहेत. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिंदेसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधकांनी या दोन्ही पदांसाठी उमेदवार उभे न केल्याने, ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक ठरली. मात्र, या निवडीच्या निमित्ताने पालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेली तुफान घोषणाबाजी आणि राजकीय कलगीतुरा चर्चेचा विषय ठरला आहे.
बिनविरोध निवड आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
या ऐतिहासिक निवडीवेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते. विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली.
निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ठाकरे ठाकरे अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. याला उत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी 'मोदी-मोदी' आणि त्यानंतर 'देवाभाऊ-देवाभाऊ' अशा घोषणांचा गजर केला. भाजपची 'मोदी-मोदी' घोषणाबाजी सुरू असतानाच ठाकरे गटाने अचानक 'चोर है, चोर है' अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अनपेक्षित पवित्र्यामुळे भाजपच्या घोषणा काही काळ थांबल्या, मात्र लगेचच त्यांनी पुन्हा 'देवाभाऊ' नावाने सभागृह डोक्यावर घेतले.
संजय राऊत यांची टीका
सभागृहातील या गोंधळावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. "मुंबई महानगरपालिकेच्या कामात आणि निवडीत मोदींच्या नावाच्या घोषणा देण्याचा संबंध काय?" असा सवाल करत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. "काल मुंबई महापालिकेत महापौरांनी काय पदभार स्विकारला आहे. ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महापौर म्हणाले की मुंबई भ्रष्टाचार मुक्त करु, चार वर्षे त्यांच्याच प्रशासकांनी भ्रष्टाचार केला. त्याची चौकशी करावी. मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शिवसेनेने केले. महापालिकेत येताना मोदींच्या घोषणा कशाला देताय? संबंध काय? नशीब अदानी अदानी अशा घोषणा दिल्या नाहीत. ही मुंबई मराठी माणसाची आहे," असं संजय राऊत म्हणाले.