Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:22 IST2025-11-18T10:20:14+5:302025-11-18T10:22:12+5:30
Chembur: गोवंडी येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका नवजात बालकाला पाच लाखांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला.

Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: गोवंडी येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका नवजात बालकाला पाच लाखांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शिवाजीनगर पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. कयामुद्दीन खान, परिचारिकेसह पाच जणांविरुद्ध बालक विक्रीचा प्रयत्न, बेकायदेशीर प्रसूती आणि जन्म नोंदणीतील अनियमिततेसह विविध गंभीर कलमांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनार पोलिसांकडून १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रुग्णालयात एका खोलीत स्ट्रेचरवर नवजात बालक आढळले. प्राथमिक चौकशीत परिचारिका अनिता सावंत (वय, ६०) हिने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता, डॉक्टर कयामुद्दीन खान यांनी २० वर्षीय अविवाहित महिलेची बेकायदेशीररीत्या प्रसूती करून घेतल्याचे समोर आले.
आईविरोधातही गुन्हा
दर्शना नावाच्या महिलेला नवजात बालकाला ५ लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, याप्रकरणी पोलिसांनी डॉ. कयामुद्दीन खान, परिचारिका अनिता सावंत, शमा ऊर्फ शफा, दर्शना आणि बाळाच्या आईविरुद्ध गुन्हा नोंदवला.
आईने बाळ सोडल्याचा दावा
बाळाची आई अविवाहित असल्याने ती बाळ सोडून निघून गेल्याचा दावा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केला. पोलिसांनी डॉ. कयामुद्दीन व परिचारिका अनिता यांचे मोबाईल, अविवाहित मातेचे आधारकार्ड, सोनोग्राफी रिपोर्ट जप्त केले आहेत. नवजात बालकाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी पालिका रुग्णालयात हलविण्यात आले.