Mumbai Air Pollution: मुंबईची हवा पोहोचली धोकादायक पातळीवर; ऋतुबदलाच्या परिणामात फटाक्यांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:24 IST2025-10-24T10:24:10+5:302025-10-24T10:24:47+5:30
Air Pollution in Mumbai: मुंबईकरांच्या प्रकृतीला धोका

Mumbai Air Pollution: मुंबईची हवा पोहोचली धोकादायक पातळीवर; ऋतुबदलाच्या परिणामात फटाक्यांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऋतुबदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतरे होत आहेत. वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे. हवेतील सूक्ष्म प्रदूषक श्वासावाटे फुप्फुस, हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचून मुंबईकरांच्या आरोग्याला घातक ठरू शकतात.
ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या हवेतील पीएम २.५ व पीएम १० या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत जानेवारी २०२५पासूनची सर्वाधिक नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये १९ कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम २.५ची या वर्षातील सर्वाधिक नोंद झाली. तर सात कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम १० ची सर्वाधिक नोंद दिसून आली. ही वाढ १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान झाली आहे.
हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या दोन प्रदूषकांच्या नोंदीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीचे विश्लेषण सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर (क्रिया) यांनी केले. या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) आणि मुंबई महापालिकेने बसवलेल्या कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सद्वारे केल्या जातात.
मुख्य प्रदुषके सीपीसीबीने पीएम १० ची (१० मायक्रॉन व्यासाच्या कणांसाठी) २४ तासांच्या सरासरीसाठी १०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी मर्यादा निर्धारित केली आहे. तर पीएम २.५ (२.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा लहान व्यासाच्या कणांसाठी) ही मर्यादा ६० इतकी आहे.
सूक्ष्म प्रदूषकांचा फुप्फुस, हृदय आणि मेंदूवर हल्ला
पीएम २.५ (फाईन पार्टिक्युलेट मॅटर) : हवेमध्ये आढळणारे सूक्ष्म प्रदूषक घटक, ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटरपेक्षा अधिक नसतो. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते सहज फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये जाऊ शकतात. परिणामी हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना इजा पोहोचू शकते.
पीएम १० (कोरस पार्टिकल्स) : हवेमध्ये आढळणारे घन आणि द्रव कण, ज्यांचा व्यास १० मायक्रोमीटरपेक्षा अधिक नसतो. म्हणजेच व्यास मानवी केसांच्या जाडीपेक्षा पाचपटीने कमी असतो. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते सहज फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतात आणि श्वसन व हृदयविकारासारख्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
कुठे किती हवा दूषित?
पीएम १०
स्टेशन पीएम १० दिनांक
पवई २०० २० ऑक्टाे.
देवनार ३२१ २० ऑक्टाे.
बोरीवली पू. २४१ १९ ऑक्टाे.
मालाड प. ३२२ २१ ऑक्टाे.
मुलुंड प. २३४ २० ऑक्टाे.
कांदिवली प. १३४ २१ ऑक्टाे.
घाटकोपर २२४ २० ऑक्टाे.
पीएम २.५
स्टेशन पीएम २.५ दिनांक
विलेपार्ले १०४ १९ ऑक्टाे.
बीकेसी २१२ २१ ऑक्टाे.
माझगाव १३० २१ ऑक्टाे.
कुलाबा १६७ २० ऑक्टाे.
चकाला १२९ २० ऑक्टाे.
वरळी १२४ २१ ऑक्टाे.
बीकेसी १२९ २० ऑक्टाे.
चेंबूर १०० २१ ऑक्टाे.
भायखळा ११९ २१ ऑक्टाे.
ऑक्टोबर हा या वर्षातील सर्वाधिक प्रदूषित महिना असल्याचे आढळते. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान १९ मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम २.५ ची यंदाची सर्वाधिक नोंद आणि सात स्टेशन्सवर पीएम १० ची सर्वाधिक नोंद झाली आहे. सणासुदीच्या काळात मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. लोकांना प्रदूषणाच्या हानीकारक पातळीला तोंड द्यावे लागत आहे. - मनोज कुमार, विश्लेषक, क्रिया.