Air Pollution: मुंबईकरांच्या तोंडाला 'मास्क', बांधकामांच्या धुळीने वायुप्रदूषणात वाढ, विकासकांना केवळ नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:21 IST2025-11-20T17:20:19+5:302025-11-20T17:21:38+5:30
Mumbai Air Pollution: मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडीबरोबरच वायुप्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिक तोंडाला मास्क लावून खबरदारी घेत आहेत.

Air Pollution: मुंबईकरांच्या तोंडाला 'मास्क', बांधकामांच्या धुळीने वायुप्रदूषणात वाढ, विकासकांना केवळ नोटीस
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडीबरोबरच वायुप्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिक तोंडाला मास्क लावून खबरदारी घेत आहेत. शहरातील अनेक ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात विकासकामांकडून होणाऱ्या प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती केल्याचा दावा पालिकेकडून केला जात असताना ही पथके काय करत आहेत, असा प्रश्न माजी विरोधी पक्षनेते व भाजप उपाध्यक्ष रवी राजा यांनी विचारला आहे. शहरातील वाढते प्रदूषण पालिकेच्या वायुप्रदूषणविरोधी उपाययोजनांवर, कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत आहे. माझगाव, मालाड, देवनार, शिवाजी नगर अशा ठिकाणची हवा सातत्याने वाईट श्रेणीत आहे. वातावरणातील घातक धूलिकणांचे प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. विकासकामांच्या ठिकाणी उडणारी धूळ, वाहनांमुळे पसरणारा धुरळा यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र व्यासाठी पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याची टीका रवी राजा यांनी केली आहे.
'पीएम १०'चे स्रोत
बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यावरील धूळ, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, औद्योगिक क्रिया आणि कचरा जाळणे, हे 'पीएम १०' चे मुख्य स्रोत आहे. या कणांमुळे डोळ्यांत घशात, नाकात खवखव निर्माण होते. मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, फुफ्फुस विकाराच्या व्यक्तींसाठी ते घातक आहेत.
श्वसन, हृदयविकारासारख्या आजारांना मिळतेय निमंत्रण
आपल्या केसांच्या जाडीपेक्षा पाचपटीने कमी असलेले प्रदूषणाचे सुक्ष्म कण प्रत्येक मुंबईकर दररोज श्वासावाटे रोज शरीरात घेत असतो. हे कण इतके सुक्ष्म असतात की, ते सहज फुफ्फुसापर्यंत पोहचू शकतात आणि त्यामुळे मुंबईकरांना श्वसन व हृदयविकारासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या धूलिकणांना 'पीएम १०' ही म्हणतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २ (सीपीसीबी) आकडेवारीच्या विश्लेषणातून ही हे दिसून आले होते. 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर' या संस्थेने या आकडेवारीचे विश्लेषण केले होते.
विकासकांना नोटिसा; पण कारवाई कुठे ?
प्रभाग स्तरावर खासगी आणि शासकीय विकासकामातून होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रणासाठी पालिकेने विशेष पथके तयार केली आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी विकासकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवल्या जात असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र तात्पुरत्या उपायानंतर त्याची सातत्याने अंमलबजावणी होते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रभाग स्तरावरील प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी पालिकेच्या पथकांची आहे. मात्र त्यानंतरही शहराच्या हवेची गुणवत्ता इतकी खालावली असेल तर या पथके काय करत आहेत? या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास होत असून, विकासकांवर पालिका कारवाई करणार आहे का नाही?- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते