Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:45 IST2025-12-18T12:42:35+5:302025-12-18T12:45:44+5:30
Mumbai Accident: रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे मीरा रोडमध्ये घडली.

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे मीरा रोडमध्ये घडली. मात्र, या प्रकरणात रस्ते बांधणी करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याऐवजी, काशिगाव पोलिसांनी मृत तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरत त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मीरा रोड येथील पूनम गार्डन, राज अँटीला इमारतीत राहणारा कुशल मृगेश नाडर (वय, २८) हा तरुण मंगळवारी पहाटे आपल्या दुचाकीवरून भाईंदरकडून काशिमीराकडे जात होता. छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. काशिगाव मेट्रो स्थानकाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात कुशलच्या दुचाकीचे चाक आदळले. यामुळे त्याचा ताबा सुटला आणि तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कुशलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची अजब भूमिका
या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच काशिगाव पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात रस्ते देखभाल करणाऱ्या ठेकेदारावर किंवा संबंधित विभागावर कारवाई करण्याऐवजी मृत कुशलवरच गुन्हा नोंदवला आहे. काशिगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल नाडर हा हेल्मेट न घालता वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव दुचाकी चालवत होता. त्याने हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव वाचला असता, असा दावा करत पोलिसांनी मृतालाच दोषी ठरवले आहे.
नागरिकांमध्ये संताप
एकीकडे मेट्रोच्या कामामुळे आणि पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तर, दुसरीकडे याच खड्ड्यांनी बळी घेतल्यानंतर प्रशासन आपली जबाबदारी झटकून मृतावरच गुन्हे दाखल करत आहे. "खड्डा नसता तर तो पडलाच नसता, मग हेल्मेटचा प्रश्नच आला नसता," अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.