मुंबईत मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:39 IST2025-03-09T17:37:16+5:302025-03-09T17:39:04+5:30

बांधकामाधीन इमारतीतील भूमिगत टाकी साफ करण्यासाठी मजूर आत उतरले होते.

Mumbai, 5 workers died while cleaning underground water tank | मुंबईत मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू...

मुंबईत मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू...

Mumbai News : मुंबईतील नागपाडा येथे रविवारी(9 मार्च 2025) मोठी दुर्घटना घडली. एका बांधकामाधीन इमारतीमधील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या 4 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. सफाई करताना कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्यावर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढून तातडीने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, पाच कामगार पाण्याच्या टाकीत साफसफाई करण्यासाठी गेले होते, पण काम करत असताना ते बेशुद्ध पडले. बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली अन् त्यांनी सर्वांना तातडीने शासकीय जेजे रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी यापैकी चार जणांना मृत घोषित केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11-11.30 च्या सुमारास ही घटना घडली. जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत मस्तान तालाबजवळील दिमतीमकर रोडवरील बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीमधील भूमिगत पाण्याच्या टाकीत हे सर्व उतरले होते. सुरुवातीला पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी नंतर या घटनेला दुजोरा देत चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाचव्या मजुराची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.

मृतांमध्ये हसीपाल शेख(19 वर्षे), राजा शेख(20), झियाउल्ला शेख(36) आणि इमांडू शेख(38) यांचा समावेश आहे. तर, पुरहान शेख(31)ची प्रकृती ठीक आहे.

सेप्टिक टाक्या स्वच्छ करण्याचे नियम काय आहेत?
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात गटारात पडून पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सेप्टिक टँक आणि सीवर लाइन्सच्या मॅन्युअल साफसफाईसाठी महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. अशा मर्यादित जागा स्वच्छ करण्यासाठी मशिनचा वापर करावा, असे महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सेप्टिक टँक आणि सीवर लाईनमध्ये अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवेश करावा.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, साफसफाई करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीने कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रवेश करण्यापूर्वी मर्यादित जागेची खोली मोजली जाईल याची खात्री करावी. कोणतेही विषारी किंवा ज्वलनशील वायू तयार नाहीत ना, हे पाहावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करावी, असेही राज्य सरकारने म्हटले होते. 

Web Title: Mumbai, 5 workers died while cleaning underground water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.