Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:09 IST2025-11-12T14:06:16+5:302025-11-12T14:09:33+5:30
Mumbai Crime: मुंबई लोकलमध्ये एका ३० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२० वाजता चर्चगेट-बोरिवली जलद लोकल ट्रेनच्या जनरल डब्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पीडित तरुणी वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असून, मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी ३० वर्षीय वकील आहे. तर, हिमांशू गांधी (वय, ४०), असे आरोपीचे नाव असून तो मालाड पूर्व येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामावरून घरी परतत असताना आरोपी हिमांशू गांधी याने तिची कोणतीही परवानगी न घेता तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तरुणीने ट्रेनमधून उतरल्यावर तिने तात्काळ बोरिवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनेच्या स्थळाबाहेरील असल्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी चर्चगेट रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले. चर्चगेट रेल्वे पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हिमांशू गांधीवर भारतीय न्याय संहिताच्या कलम ७७ , ७८ आणि ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.