आयसीटीला मुकेश अंबानींकडून १५१ कोटींची गुरुदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:40 IST2025-06-08T09:39:41+5:302025-06-08T09:40:07+5:30

Mukesh Ambani: विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती, त्या संस्थेला अंबानी यांनी १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

Mukesh Ambani gives Gurudakshina of Rs 151 crore to ICT | आयसीटीला मुकेश अंबानींकडून १५१ कोटींची गुरुदक्षिणा

आयसीटीला मुकेश अंबानींकडून १५१ कोटींची गुरुदक्षिणा

मुंबई  - विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती, त्या संस्थेला अंबानी यांनी १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) ही संस्था यापूर्वी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या नावाने ओळखली जात होती. या संस्थेतून अंबानी यांनी १९७० च्या दशकात केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.

प्रसिद्ध संशोधक आणि प्रा. एम. एम. शर्मा यांनी लिहिलेल्या ‘डिव्हाइन सायंटिस्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मुकेश अंबानी शुक्रवारी आयसीटी संस्थेमध्ये आले  होते. त्यावेळी त्यांनी या देणगीची घोषणा केली. यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की,  मी विद्यार्थी असताना प्राध्यापक शर्मा यांचे पहिलेच लेक्चर ऐकून मी प्रभावित झालो होतो.

भारताच्या आधुनिकीकरणामध्ये प्रा. शर्मा यांचे उत्तुंग योगदान आहे. माझ्या वडिलांप्रमाणेच त्यांनादेखील भारताचा चेहरा बदलण्याचा ध्यास होता आणि त्यांनी ज्ञानदान करण्यासोबतच उद्योगाचा चेहरा बदलण्यासाठी मोठे काम केले आहे. गरीब भारत ते जागतिक नेतृत्व करणारा भारत असा बदल करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी अंबानी यांनी प्रा. शर्मा याचा ‘राष्ट्रगुरु’ असा उल्लेख करत गौरव केला. तसेच, आयसीटी या संस्थेसाठी तुम्ही काहीतरी मोठे करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. शर्मा यांनी आपल्याला सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांचे ऐकायचे हा आमचा शिरस्ता आहे. त्यामुळेच मी १५१ कोटी रुपयांची देणगी नव्हे तर गुरुदक्षिणा देत असल्याचे अंबानी यावेळी जाहीर केले.

 

Web Title: Mukesh Ambani gives Gurudakshina of Rs 151 crore to ICT