Join us
Daily Top 2Weekly Top 5

दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:54 IST

वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारु पार्टीवरुन खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.

Bandra Fort liquor party: मुंबईतील ४०० वर्षे जुन्या आणि ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर ओली फेस्टमध्ये दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमासाठी सरकारकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यावर अशा पार्ट्यांच्या आयोजनावरून सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीही उपस्थिती लावल्याचा दावा विरोधकांनी केला. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही आशिष शेलार यांच्यावर टीका करत तिथे गेल्यावर दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? असा सवाल केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या पार्टीचे व्हिडिओ पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला. अखिल चित्रे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टीचे मोठे काउंटर लावलेले दिसत होते. या ऐतिहासिक किल्ल्यात अशा पार्ट्यांचे आयोजन कसे झाले, याबद्दल विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाला एका फोटोमुळए वळण मिळाले. त्यांनी या पार्टीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती असल्याचा आरोप करणारा फोटो पोस्ट केला. ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही, हे आता समजलं असेलच, असेही चित्रे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी व्हिडिओ पाहिला नसला तरी, घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले आणि अशा पार्टीला परवानगी दिली असल्यास निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्या उपस्थितीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

भाजपचा हा दुतोंडीपणा योग्य नाही - वर्षा गायकवाड

"वांद्रे किल्ला या ऐतिहासिक हेरिटेज स्थळी दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्र्यांनी हजेरी लावली यातून चुकीचा पायंडा पाडला जात आहे. वांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा व्हिडिओ बाहेर आल्यावर आता सांस्कृतिक मंत्री शेलार म्हणत आहेत, पार्टी चुकीची होती. मग या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री गेलेच का? तिथे गेल्यावर दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? पार्टी करून झाल्यावर बोंबाबोंब झाली म्हणून आता पार्टी चुकीची होती आठवल का? भाजपचा हा दुतोंडीपणा योग्य नाही. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. सर्व हेरिटेज किल्ल्यांवर सुरक्षा धोरण त्वरित राबवावे. इतर किल्ल्यांवर असे उपद्व्याप होऊ नयेत यासाठी तातडीने पाऊले उचलावीत," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Liquor party at Bandra Fort sparks row; Gaikwad questions Shelar.

Web Summary : Bandra Fort liquor party sparks outrage. Gaikwad questions Shelar's presence, demanding accountability and investigation. Fadnavis orders probe, promising strict action if rules were violated.
टॅग्स :वर्षा गायकवाडआशीष शेलारभाजपा