“पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:19 IST2025-05-28T13:18:17+5:302025-05-28T13:19:01+5:30

Sanjay Raut News: ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय सैन्याला माघारी का बोलावले हे राणेंनी स्पष्ट करावे, असा पलटवार संजय राऊतांनी केला.

mp sanjay raut replied narayan rane on criticism on thackeray group | “पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

“पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

Sanjay Raut News: तुम्ही कोण आहात? तुम्ही तर भाजपाचे आश्रित आहात. तुम्ही स्वत:चा पक्ष काढून दाखवला असता तर आम्ही तुम्हाला मानले असते. राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे, पण तुम्ही भाजपाचे आश्रित आहात. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:चे २० आमदार आणि ९ खासदार आहेत. भाजपाचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

संजय राऊतांच्या नादाला लागू नका, ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते, असे सांगत नारायण राणे यांनी ठाकरे गटावरही जोरदार टीका केली होती. याबाबत प्रश्न विचारल्यावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राणेंनी आपल्या वयाचे भान ठेवावे. आपले वय झाले, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

POK घेण्याचे पुढे काय झाले?

पाकिस्तानात कुणाला पाठवायचे हे भविष्यात ठरवू. पाकिस्तानविरोधात मोदींनी दंड थोपटले होते. प्रेसिडंट ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या सैन्याला माघारी का बोलावले हे राणेंनी स्पष्ट करावे. ऑपरेशन सिंदूर चालवले. पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणार अशी गर्जना मोदी आणि भाजपाने केली त्याचे काय झाले? याचे उत्तर राणेंनी द्यावे. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचे की मोदींना? आम्ही नाही गेलो पाकिस्तानात, पण मोदी नवाज शरीफचा केक कापायला पाकिस्तानात गेले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी करून दिली. 

दरम्यान, नवाज शरीफचा केक कापायला कोण गेले तर मोदी गेले, हे मिस्टर राणे विसरले वाटते. आम्ही नाही गेलो. राणेंनी आपल्या वयाचे भान ठेवावे आणि विधाने करावीत. फक्त स्वत:च्या पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्यांनी पाय खेचले. त्यांच्या शौर्याचे पोवाडे राणेंनी गाऊ नये, अशी टीका संजय राऊतांनी केली.  

 

Web Title: mp sanjay raut replied narayan rane on criticism on thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.