उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:48 IST2025-01-12T10:46:15+5:302025-01-12T10:48:31+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut PC News: काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे कुणाला मिरची लागायचे कारण नाही. पक्षविस्ताराचा आम्हाला अधिकार आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले.

उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...”
Thackeray Group MP Sanjay Raut PC News: उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे राज्यभरातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पदाधिकाऱ्यांशी, नेत्यांशी संवाद साधत आहेत. बैठका घेत आहेत. युतीत निवडणुका लढवल्या तर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, अशी त्यांची भावना असते. हीच भावना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगळी असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वेगळी असते. आम्हाला आमच्या ताकदीवर लढायला मिळत असेल, तर पक्ष मजबूत होऊ शकतो. पक्षविस्तार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या तिखट प्रतिक्रियेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी माझे विधान आधी नीटपणे ऐकावे. ऐकून घेण्याची सवय असली पाहिजे. काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. समोरच्याचे नीट ऐकणे मोठी गोष्ट असते. मी इतकेच म्हणालो होतो की, लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी तयार करण्यात आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढावे, ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आमचे निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
कुणाला मिरची लागायचे कारण नाही
ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा निवडणुकांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. हे सर्वच पक्षांचे मत आहे. इंडिया आघाडी तुटली किंवा महाविकास आघाडी तुटली, असे मी कधीही म्हटले नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे कुणाला मिरची लागायचे कारण नाही. सर्व पक्षांना आपापला विस्तार करण्याचा अधिकार आहे. आपल्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सर्व पक्ष करतात. भाजपासोबत जेव्हा आम्ही युतीत होतो, तेव्हाही आम्ही महापालिका निवडणुका स्वतंत्रच लढलो होतो, याची आठवणही संजय राऊत यांनी यावेळी करून दिली.
दरम्यान, आघाडीमध्ये कोणताही निर्णय चर्चा करून घेतला पाहिजे. परस्पर कोणी निर्णय जाहीर करत असेल तर काँग्रेस पक्षही त्यांचा निर्णय घेईल, असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तर, आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.