Join us

"महायुतीच्या नेत्यांच्या बंगल्यावर होणारी हाणामारीसुद्धा..."; जागावाटपावरुन नाना पटोलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:14 IST

Nana Patole : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतच्या शेवटच्या चर्चेबाबत नाना पटोले यांनी माहिती दिली.

Mahavikas Aghadi Seat Sharing : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरु आहेत. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीचे नेते लवकरच जागावाटप जाहीर करणार आहे.  महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र आजच्या बैठकीत निश्चित होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांनाही नाना पटोले यांनी इशारा दिला आहे. 

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना  ठाकरे गटातील वादावर  शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर आज अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. त्याआधी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आणि काँग्रेस उमेदवारांच्या यादी याबाबत सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता दुपारी मविआ नेत्यांची बैठक होणार असून  २५-३० जागांचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

"आमच्यापेक्षा जास्त गडबड महायुतीमध्ये आहे. त्यांच्या नेत्यांच्या बंगल्यावर जाऊन पाहा कशाप्रकारे हाणामारी सुरु आहे. तेसुद्धा माध्यमांनी दाखवलं पाहिजे. जागा वाटपामध्ये अडचणी येत असतात. कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा दबाव असतो. नेत्यांना वाटतं की कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जागा घ्यायला हवी. आमचा विषय आज उद्यामध्ये मिटणार आहे. आम्ही बाळासाहेब थोरात यांना काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्यांच्यासोबतही माझी बैठक होणार आहे. त्यानंतर आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक होणार आहे. २५-३० जागांचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल आणि कोणतीही नाराजी नाही," असं नाना पटोले म्हणाले.

"बाळासाहेब थोरातांकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक करणार आहे. त्यानंतर जागावाटपाची बैठक होईल. आता खेळ सुरु होणार आहे. भाजपने खेळ सुरु केला होता पण आता कसा विखुरला जातो ते पाहा," असा इशाराही नाना पटोले यांनी दिला. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४नाना पटोलेमहाविकास आघाडीभाजपा