पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 23:03 IST2025-09-15T22:57:14+5:302025-09-15T23:03:08+5:30
Monsoon Rain Alert Updates: संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबईसह काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
Monsoon Rain Alert Updates: मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर यांसह राज्यभरात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने मुंबई-ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी चांगलेच झोडपले. यानंतर आता पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला. मुंबईत, विशेषतः उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. शहरातील अंतर्गत रस्ते व महामार्गांवरील वाहतूक मंदावली. ठाण्यात १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथे २४.७ मिमी, सांताक्रूझ येथे २९.६ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह, ठाणे पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या पडत असलेला पाऊस परतीचा नसल्याचे म्हटले जात आहे. विदर्भात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंबई बरोबरच राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर आहे. याआधी पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि नाशिक भागातही मुसळधार पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.