Monsoon breaking Record of record, Mahabaleshwar 3 thousand mm across | मान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार
मान्सून मोडतोय रेकॉर्डचेही रेकॉर्ड, महाबळेश्वर ३ हजार मिमी पार

- सचिन लुंगसे
मुंबई : महाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी आॅगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अद्याप अर्धा आॅगस्ट शिल्लक आहे. दुसरीकडे देशात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाली असून, मुंबईचा विचार करता १६ आॅगस्टपर्यंत मुंबईत २ हजार ४९०.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१८ साली १६ आॅगस्टपर्यंत मुंबईत २ हजार १९ पूर्णांक ३ मिमी पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत मुंबईत सुमारे पाचशे मिलीमीटर एवढा अधिकचा पाऊस झाला आहे.

८ ते १४ आॅगस्टदरम्यानच्या आकडेवारीनुसार, उत्तर पश्चिम भारतात सर्वसाधारणरीत्या ४९.८ मिलीमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात या वेळी ती ३८.८ मिमी एवढी झाली आहे. याचा अर्थ सर्वसाधारणरीत्या कमी पाऊस झाला असून, हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार तो २२ टक्के उणे आहे. मध्य भारतात सर्वसाधारणरीत्या ७२.६ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या वेळी तो १४७.५ मिमी झाला आहे. हा पाऊस १०३ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे. दक्षिण द्वीपकल्प भागात सर्वसाधारणरीत्या ४६.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी ९६.८ मिमी पाऊस पडला असून, हा १०९ टक्के अधिकचा पाऊस आहे. पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात सर्वसाधारणपणे ८०.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी तो ५५.४ मिमी पडला आहे. हा पाऊस ३१ टक्के उणे आहे.

१ जून ते १६ आॅगस्टदरम्यान राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, गोव्यातही चांगला पाऊस
१ जून ते १६ आॅगस्टदरम्यान उपविभागीय रचनेनुसार मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल कोकण-गोवा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात विभाग, पश्चिम मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थानमध्ये उत्तम पाऊस झाला आहे.अनुकूल हवामानाने मान्सूनचा जोर वाढला
८ ते १४ आॅगस्टदरम्यान संपूर्ण देशात सर्वसाधारणरीत्या ६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र अनुकूल हवामानामुळे या काळात पाऊस चांगला बरसला आहे. परिणामी, या कालावधीत ८९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ४५ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे.

२००९ सालच्या आॅगस्ट महिन्यात सर्वांत कमी पाऊस
महाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी आॅगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तंतोतंत हा आकडा ३ हजार पूर्णांक ७ मिलीमीटर एवढा आहे. महत्त्वाचे म्हणजे अद्याप अर्धा आॅगस्ट महिना बाकी आहे. १९९२ सालापासून आतापर्यंतच्या नोंदी तपासल्या असता २००९ सालच्या आॅगस्ट महिन्यात सर्वांत कमी म्हणजे ६१४.४ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला होता. २००४ सालच्या आॅगस्ट महिन्यात ३ हजार ९६ मिलीमीटर पाऊस नोंदविला होता.

Web Title: Monsoon breaking Record of record, Mahabaleshwar 3 thousand mm across

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.