Join us  

मोदी पंतप्रधान नव्हे तर अ‍ॅडमॅन, राष्ट्रवादीचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 2:09 PM

मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नव्हे तर 'अ‍ॅडमॅन' लाभला आहे. कामं होवो न होवोत, भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयार असते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला

मुंबई - मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नव्हे तर 'अ‍ॅडमॅन' लाभला आहे. कामं होवो न होवोत, भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयार असते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. त्याचसोबत मोदी साहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. देशावरील वाढलेल्या कर्जाबाबत ते माध्यमांशी बोलत होते. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने केला आहे आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजारांचे कर्ज करून ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

 

नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे जे ३०-४० लाख कोटींचे कर्ज साडेचार वर्षांत वाढले, तो पैसा गेला कुठे असा सवालही पाटील यांनी केला. ३० लाख कोटी रुपये उभे केले ते कशावर खर्च केले? देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात, तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यांवर किती खर्च केले याचा हिशोब मोदी सरकार देणार नाही. आज वृत्तपत्रांत पाने भरभरून जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन दोन - तीन तीन जाहिराती दिल्या जात आहेत, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या देशात भाजपा कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करते आहे. परदेशी वार्‍यांवर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीजयंत पाटीलभाजपाराजकारण