मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना सामानाबरोबरच मोबाइलही सांभाळा. त्याला कारणही तसेच आहे. कारण मागील ३० महिन्यांच्या काळात मुंबई लोकलमध्ये २६००० मोबाईल चोरीला गेले. या सगळ्या मोबाईलची किंमत आहे ६२ कोटी रुपये! यातील किती मोबाईल त्यांच्या मालकांना परत मिळाले, ती आकडेवारीही धक्कादायक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रेल्वे पोलिसांच्या आकेडवारीतून ही बाब समोर आली आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२५ या कालावधीत मुंबई लोकलमधून २६००० मोबाईल चोरीला गेले. यापैकी ४५ टक्के म्हणजेच ११ हजार ८५३ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. २० कोटींचे मोबाईल पोलिसांनी शोधून काढले.
कोणत्या वर्षी किती मोबाईल चोरले गेले?
मुंबई लोकलमध्ये २०२३ या वर्षामध्ये १२ हजार १५९ मोबाईल चोरीला गेले होते. त्यापैकी ५,४२२ मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. २०२४ मध्ये १० हजार ९८१ मोबाईल चोरीला गेले, त्यापैकी ५ हजार २० मोबाईळ पोलिसांनी शोधून काढले.
जानेवारी २०२५ ते मे २०२५ या काळात ३ हजार ५०८ मोबाईल चोरीला गेले होते, त्यापैकी १,४११ मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत.
कोणत्या वर्षी किती कोटींचे मोबाईल चोरीला?
आता किंमतीमध्ये सांगायचं झालं, तर २०२३ मध्ये २६.२ कोटींचे मोबाईल चोरीला गेले होते. ८.९० कोटींचे मोबाईल शोधण्यात आले. २०२४ मध्ये २७.१ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले होते. ८.८ कोटींचे मोबाईल पोलिसांनी शोधले. मे २०२५ पर्यंत चोरीला गेलेल्या मोबाईल्सची किंमत ९.५१ कोटी होती. त्यापेकी २.५७ कोटींचे मोबाईल पोलिसांनी शोधले आणि त्यांच्या मालकांकडे परत केले.
चोरण्यात आलेले मोबाईल स्थानिक बाजारातील खरेदीदाराला विकले जातात. त्यानंतर त्यातील पार्ट्स इतर मोबाईलसाठी वापरले जातात. चोरल्या नंतर दुरुस्ती करून विकण्याता आलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी देशभरात जातात. अनेक प्रकरणांमध्ये मुंबईत चोरलेले आणि विकलेले गेले मोबाईल, झारखंड, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये सुरू झाले होते, असेही पोलिसांनी सांगितले.