इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:12 IST2025-05-24T16:11:07+5:302025-05-24T16:12:05+5:30
Mumbai underground Metro: भुयारी मेट्रोतून प्रवास करताना कॉल, इंटरनेट आणि यूपीआय यांसारख्या सुविधा ठप्प होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांत या मेट्रो मार्गिकेवरून तब्बल ४ लाख ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला. याच पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. भुयारी मेट्रोतून प्रवास करताना कॉल, इंटरनेट आणि यूपीआय यांसारख्या सुविधा ठप्प होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्याने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहले आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विंगचे अध्यक्ष अखिल अनिल चित्रे यांनी एमएमआरसीएल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "मुंबईकरांच्या संयमाची किती काळ परीक्षा घ्यायची आहे. मोबाईल नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची मक्तेदारी एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आली आणि टेलिकॉम कंपन्यांना मेट्रोपासून दूर ठेवण्यात आले. मात्र, याचा फटका सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मुंबई शहर विश्वास आणि जबाबदारीवर चालते. जर हा विश्वास तुटला तर मुंबईला आवाज कसा उठवायचा? हे माहिती आहे", असाही इशारा त्यांनी दिला.
ठाकरे गटाच्या प्रमुख मागण्या:
- सर्व मेट्रो स्थानके आणि बोगद्यांमध्ये मोबाईल नेटवर्क सेवा त्वरित पूर्ववत करावी.
- टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत सुरू असलेल्या वाटाघाटींच्या स्थितीबद्दल पारदर्शक माहिती दिली पाहिजे.
- प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, याची हमी दिली पाहिजे.