Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल; 'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:23 IST2025-11-01T12:22:33+5:302025-11-01T12:23:04+5:30
Mumbai Traffic Update Today: पोलिसांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल; 'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखालील 'सत्याचा मोर्चा' आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नियोजित आंदोलनामुळे आज दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोलिसांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
हा मोर्चा आज दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल. आंदोलक मोठी गर्दी करतील अशी अपेक्षा असल्याने दुपारपासून सायंकाळपर्यंत दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे बंद किंवा वळवण्यात येणार आहेत.
दुपारी १२ ते ५ 'या' मार्गांवर जाणे टाळा!
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी मोर्चा सुरू झाल्यानंतर साधारणतः ४ वाजेपर्यंत मोर्चा संपेपर्यंत आझाद मैदान, सीएसटी, महापालिका मार्ग, डीएन रोड आणि आसपासचे मुख्य रस्ते बंद राहतील किंवा त्यांवरील वाहतूक वळवण्यात येईल.
जास्त गर्दी अपेक्षित: चर्चगेट, बॉम्बे हॉस्पिटल, जेजे पूल आणि बीएमसी मुख्यालय परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवासाला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
अशावेळी पूर्व आणि पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आझाद मैदान आणि बीएमसीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद किंवा नियंत्रित केले जाऊ शकतात.

सार्वजनिक वाहतूक वापरा!
पोलिसांनी नागरिकांना दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान सीएसटी, आझाद मैदान आणि बीएमसी मुख्यालय परिसरात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. दादर, भायखळा किंवा मुंबई सेंट्रल येथून प्रवास करणाऱ्यांनाही अप्रत्यक्ष विलंब होऊ शकतो.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण मोर्चा मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक वाहनांना मात्र या मार्गांवरून जाण्याची परवानगी दिली जाईल.
आंदोलनावर ठाम!
'९६ लाख बोगस मतदार' या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आज मुंबईत नियोजित रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत फेरफार करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधी पक्षांनी दावा केला आहे की, मतदार यादीत जवळपास ९६ लाख बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे. या संयुक्त आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, विरोधी पक्षांनी मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.
मुंबईकरांना आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे थेट अपडेट्स तपासत राहण्याचे आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.