Join us  

... अन् मनसैनिकांनी प्रोड्युसरला धू धू धूतला, अमेय खोपकरांनी सांगितला संपूर्ण किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:22 PM

मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. त्यावेळी, तिने घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानुसार, या अभिनेत्रीला एका कास्टींग दिग्दर्शकाने फोन केला होता.

ठळक मुद्देत्या मुलीने हिंमत दाखवून ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनीही मनचिसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर, मला याबाबत माहिती मिळाली. मी ताबडतोब त्यांना ट्रॅप करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या

मुंबई - कास्टींग काऊच हे नाव बॉलिवूड किंवा चित्रपटनगरीसाठी नवं राहिलं नाही. मात्र, मीटू मोहिमेनंतर आजही काही अभिनेत्रींकडे कामाऐवजी शारीरीक सुखाची मागणी केली जाते. मुंबईत कास्टींग डिरेक्टरकडून एका अभिनेत्रीबाबत नुकताच असा एक प्रकार घडला. मात्र, मनचिसेमुळे या घटनेतील संबंधित व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, या घटनेचे व्हिडिओही शेअर केले आहेत.  मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. त्यावेळी, तिने घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानुसार, या अभिनेत्रीला एका कास्टींग दिग्दर्शकाने फोन केला होता. तूला एका हिंदी चित्रपटासाठी कास्ट केलेलं आहे. पण, जर तुला या चित्रपटासाठी लीड रोल हवा असल्यास उद्या चित्रपटाचे प्रोड्युसर युपीतून मुंबईत येत आहेत. त्या प्रोड्युसरला तुला खुश करावं लागेल, तुला त्यांच्याशी कॉम्परमाईज करावं लागेल, अशी विचारणा करण्यात आली होती, असे अभिनेत्रीने सांगितल्याचे मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्हिडिओतून सांगितलं आहे.  

त्या मुलीने हिंमत दाखवून ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनीही मनचिसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर, मला याबाबत माहिती मिळाली. मी ताबडतोब त्यांना ट्रॅप करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार, आज ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फार्म हाऊसवर ही मुलगी गेली. त्यावेळी, मनसेचे पदाधिकारी सोबत होतेच. त्यांनी या चारही नराधमांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या चारही जणांकडे बंदुकीचे कट्टेही सापडले आहेत. गिरीजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी त्यांची नावे आहेत. हे चारही जण लखनौहून आले होते. 

दरम्यान, त्या मुलीने दाखवलेल्या हिंमतीमुळेच हे शक्य झालं, तिच्या हिंमतीला सलाम... असे म्हणत घडला प्रकार अमेय खोपकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे. तसेच, संबंधित व्यक्तींना मनसैनिकांनी केलेल्या मारहाणीचेही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. 

टॅग्स :मनसेबॉलिवूडगुन्हेगारीठाणेपोलिसकास्टिंग काऊच