"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:44 IST2025-12-23T09:42:18+5:302025-12-23T09:44:25+5:30
BMC Election 2026: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जागावाटपही जाहीर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज ठाकरेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC ELection: नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकींवर केंद्रीत केले आहे. सगळ्यांचेच लक्ष असलेल्या बृहन्मुंबई महापालिका निवडणूक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पत्र एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आज जागावाटप करणार असल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज ठाकरेंना काळजी घ्य म्हणत सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक पोस्ट करत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या होऊ घातलेल्या आघाडीवर भाष्य केले आहे. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली. त्यावेळी बंद खोलीत मुख्यमंत्री पदाचे वचन दिल्याचे ठाकरेंनी म्हटले होते. भाजपने हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. याच मुद्द्याची आठवण राज ठाकरेंना भाजपने करुन दिली आहे.
बाळासाहेबांच्या बंद खोलीत वचन
उपाध्ये यांनी म्हटले आहे की, "राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी! आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार. आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या. नंतर अचानक मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत वचन दिलं होतं सांगून, मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", असा उद्धव ठाकरेंना टोला लगावत राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला भाजपने दिला आहे.
मनसे-ठाकरे शिवसेना आज करणार घोषणा
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाची चर्चा सुरू होती. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, आज (२३ डिसेंबर) वरळीतील एनएससीआय डोममध्ये दोन्ही पक्ष आघाडीची घोषणा करणार आहेत.
खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (२२ डिसेंबर) राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. ४५ मिनिटं ही बैठक चालली. दोन्ही पक्षाच्या आघाडीचे स्वरूप, जागावाटप, पुढचे धोरण आणि निवडणूक रणनीती, त्याचबरोबर पक्षामधील समन्वयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी जागावाटप निश्चित झाले असून आज घोषणा केली जाणार आहे.