MNS signal alert for 22 august, if people need important work then left from home, | २२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशारा

२२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशारा

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजाविल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरेंच्या घरी मनसेच्या नेत्यांची बैठक झाली त्यानंतर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी हा सूचक इशारा देण्यात आला आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांकडून काहीही घडू शकते असं विधान अभिजीत पानसे यांनी केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा बिघडेल की काय अशी शंका उपस्थित होते. 

अभिजीत पानसे यांनी सांगितले आहे की, भीती घातली की लाळगोटेपणा करणाऱ्या नेत्यांपैकी आम्ही नाही. २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे २२ तारखेला राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांकडून काहीही घडू शकतं. २२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं सूचक विधान करत त्यांनी महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 

मोदी सरकारकडून विरोधकांच्या गळचेपीचं धोरण देशभरात राबविले जात आहे. मराठी माणूस खंबीरपणे राज ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील. ईडीच्या कारवाईविरोधात कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे बाहेर पडू शकतात. त्यामुळे काय घडेल हे सांगता येणार नाही असं मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितले आहे. 

२२ ऑगस्टला ठाणे बंदचं आवाहन 
राज ठाकरेंना ईडीची नोटीस पाठविल्यानंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून २२ ऑगस्टला बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. बंद न पाळल्यास कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. मराठी माणूस खंबीरपणे राज ठाकरेंच्या पाठिशी आहेत. २२ ऑगस्टला गरज असेल तर घराबाहेर पडा. रस्त्यावर उतरुन राज ठाकरेंना साथ देऊ यासाठी २२ तारखेला ठाणे बंदचं आवाहन मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे. 

तसेच राज ठाकरेंना पाठविण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा विरोधकांना दडपण्यासाठी वापर केला जात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. 

Web Title: MNS signal alert for 22 august, if people need important work then left from home,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.