MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:37 IST2025-12-23T13:35:46+5:302025-12-23T13:37:50+5:30
MNS Shiv Sena UBT Alliance News: मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची घोषणा टळली. मंगळवारी ही घोषणा केली जाणार होती, पण आता बुधवारी जागावाटप आणि युतीची घोषणा होणार आहे.

MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र उतरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. आज युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाणार होती. पण, आता नवा मुहूर्त शोधण्यात आला आहे. बुधवारी (२४ डिसेंबर) याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, यात मुंबई महापालिका निवडणुकीकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे.
गेल्या काही महिन्यांपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्रित महापालिका निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. दोन्ही पक्षांचे जागावाटपही झाल्याचे सांगण्यात आले. आज (२३ डिसेंबर) दोन्ही पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार होती, पण ऐनवेळी ती पुढे ढकलण्यात आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत 'उद्या, १२ वाजता', असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मनसे-ठाकरे युतीची घोषणा नव्या मुहूर्तावर केली जाणार आहे.
उद्या
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटप पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी काही जागांवरून तिढा कायम असल्याचे कळते. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागावाटपाची प्रक्रिया अनावश्यक ताणून धरू नका. ती लांबवू नका, असे सांगितले होते. पण, तरीही जागांचा तिढा कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीत भाजप-शिवसेना एकत्र
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युतीची घोषणा केली. मात्र, नवाब मलिक यांच्याकडे बोट दाखवत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे.
सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी ५० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, पक्षाने अद्याप याबद्दलचा निर्णय जाहीर केलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळाचे दंड थोपटल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.