Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी...;" मनसेचं पोलिसांना आव्हान

By जयदीप दाभोळकर | Updated: January 6, 2021 08:55 IST

पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये, त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा; संदीप देशपांडे यांची मागणी

ठळक मुद्देमंगळवारी पोलिसांकडून मनसैनिकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरलपोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये, संदीप देशपांडे यांची मागणी

परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे वसईत आले होते. यावेळी त्या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढताना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसंच दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. यानंतर व्हिडीओ शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना जाहीर आव्हान दिलं आहे. "ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलं त्याच हातांनी सलाम करायला लावू," असं संदीप देशपांडे म्हणाले. "वसई-विरार येथील कार्यक्रमाचा व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला. आमचे दोन महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमात आयुक्त भेट देत नाहीत त्यांनी आम्हाला भेट द्यावी यासाठी कार्यक्रमात आंदोलन करत होते. त्यानंतर त्यांच्यावर हात उचलणारे पोलिसही आम्ही पाहिले. ते पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई-बहिणीवरून शिव्या देत होते. पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये," असं संदीप देशपांडे म्हणाले."सत्ता येते आणि जाते. पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि कार्यकर्त्यांना कानशीलातही लगावली. त्याचीही गरज नव्हती. ज्यावेळी पोलीस त्यांना नेत होते त्यावेळी ते तुमच्यासोबत आले. एवढा माज दाखवू नये आणि पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये. एवढीच हिंमत असेल तर दोन तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी वन बाय वन भिडा. तेव्हा आम्ही दाखवतो की महाराष्ट्र सैनिक काय असतो. जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलू नये याची आम्हाला शिकवण आहे म्हणून आम्ही या गोष्टी सहन करत आहोत. याचा अर्थ आम्ही प्रत्येक गोष्टी सहन करू असा होत नाही. ज्या पोलिसांनी हात उचलला आणि शिवीगाळ केला त्यांना तातडीनं निलंबित करावं अशी आमची मागणी आहे," असंही ते म्हणाले.

टॅग्स :मनसेसंदीप देशपांडेपोलिसएकनाथ शिंदेवसई विरार