लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मनसेने २०१४ ची विधानसभा आणि २०१७च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता. त्यामुळे आता उद्धवसेनेला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना योग्य प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
उद्धवसेनेचे नेते आ. अनिल परब यांनी मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक असून, राज ठाकरे यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले की, गेल्या वेळी त्यांनी विश्वासघात केला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडून युतीबाबतचा ठोस प्रस्ताव यावा, अशी अपेक्षा आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या हितासाठी युती करण्यास कुणी इच्छुक असेल तर त्यावर विचार करू, युती झाली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.