लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 02:48 PM2019-11-14T14:48:26+5:302019-11-14T14:51:54+5:30

Lata Mangeshkar's Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MNS Raj Thackeray Tweet Lata Mangeshkar | लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले...

लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी (13 नोव्हेंबर) दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

'दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय' असं ट्वीट राज ठाकरे यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. डॉ. प्रतीत समधानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या लवकरच घरी परततील, अशी खात्री मंगेशकर कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सर्व चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत मंगेशकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभारही मानले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी लतादीदींना पत्र लिहिले आहे. ‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी मला खात्री आहे,’ अशा सदिच्छा राज्यपालांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

दीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. अलीकडेच 28 सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला आहे. ट्विटरवर सक्रिय राहणाऱ्या लता मंगेशकर यांनी वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर इंस्टाग्रामवर आपलं अधिकृत अकाउंट सुरू केलं. यासोबतच त्यांनी दोन फोटोदेखील शेअर केले. लता मंगेशकर यांनी हिंदी सिनेमात हजारो गाणी गायली आहेत. आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कार तसेच प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
 

Web Title: MNS Raj Thackeray Tweet Lata Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.