मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:34 IST2025-04-09T11:33:23+5:302025-04-09T11:34:33+5:30
मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यावरून हा फोन आल्याचं समोर आलं आहे.

मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी-अमराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज ठाकरे हिंदूविरोधी असून त्यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेनेही यावर आक्रमक प्रतिक्रिया देत भय्ये आमच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करत असतील तर आम्हालाही त्यांना इथं राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं म्हटलं. मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला असून मंगळवारी रात्री अज्ञाताने देशपांडे यांना फोन करून धमकी दिल्याचं समोर आले आहे.
संदीप देशपांडे यांनी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला. तुम्हाला घरी येऊन मारू वैगेरे धमकी देत होता. असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. याबाबत मी पोलीस तक्रार केली आहे. कुणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करतंय का याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले होते संदीप देशपांडे?
मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल. आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? त्या याचिकेमागील षड्यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्यंत्र आहे. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही असं त्यांनी म्हटलं होते.
राज ठाकरे हिंदूविरोधी
जर महाराष्ट्रात भविष्यात कुठेही गजवा ए हिंद झालं तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा राहयला हवा की नको? तुम्ही उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचं विभाजन करत आहात अशी टीका उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंवर केली आहे. हिंदूंना कृपा करून विभाजित करू नका. उत्तर भारतीय विकास सेना हा राजकीय पक्ष असून आम्ही उघडपणे सनातनी पक्ष असल्याचं सांगतो. जर तुम्ही हिंदूंविरोधात अशी भूमिका घेत असाल तर आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचं उल्लंघन करत आहात. तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.