Join us  

उद्धव ठाकरेंची नियत साफ, पण एकनाथ शिंदे...; मनसेने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 3:44 PM

येत्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट घेणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकल्याण डोंबिवलीत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात यावी यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील आग्रही आहेत. राजू पाटील यांनी 27 गावांची नगरपालिका स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. उद्धव ठाकरे जेव्हा डोंबिवलीत गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा मी 27 गावांबाबत स्थानिक लोकांच्या मनातील भावना सांगितल्या होत्या.

मुंबई:  कल्याण डोंबिवलीत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात यावी यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील आग्रही आहेत. तसेच राजू पाटील यांनी 27 गावांची नगरपालिका स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. याबाबत राजू पाटील यांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांची 27 गावांची  स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबत नियत साफ दिसते आहे. मात्र शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्र्यांची नियत साफ दिसत नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

राजू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा डोंबिवलीत गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा मी 27 गावांबाबत स्थानिक लोकांच्या मनातील भावना सांगितल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या भावना असतील तर 27 गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना दिले होते असं राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. मात्र अजूनही निर्णय न घेतल्यामुळे 27 गावांची  स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसत आहे. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तशी नियत दिसत नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट घेणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. 

27 गावे नगरपालिका हद्दीतून वगळण्याच्या मागणीकरिता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिका न्यायप्रविष्ट आहेत. तत्कालीन भाजप सरकारने 2015 पासून समितीला गावे वगळण्यात येतील, असे आश्वासन दिले. न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. मात्र गावे वगळली जातील असे सांगण्यात येत होते. राज्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपा सरकारने आधी गावे समाविष्ट केली. त्यानंतर ती वगळण्याचे आश्वासन दिले. मात्र शिवसेनेची भूमिका ही गावे वगळण्याची नव्हती. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी सहभागी आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी सरकारच्या काळात 2002 साली नगरपालिकेतून ही गावे वगळली होती. त्यामुळे दोन परस्पर विरोधी भूमिका असलेले पक्ष महाविकास आघाडीत असल्याने आत्ता तरी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीकरीता गावे वगळली जाणार की नाही या प्रश्न कायम आहे.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेराजू पाटीलमनसेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारकल्याण डोंबिवली महापालिका