Join us  

लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:16 AM

व्यापर आणि रोजगार सुरु करण्यासाठी अमेरिका पॅटर्न राबवण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे, तर काही जिल्ह्यांतील काहीशी चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात सरसकट लॉकडाऊनऐवजी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गतचे निर्बंध हे जिल्हानिहाय निश्चित करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच नियमावली नसेल. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. 

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची अनुमती मुंबई व एमएमआर क्षेत्रात दिली जाणार नसल्याची माहिती, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली. लोकल सुरू न केल्याने गर्दी टाळता आली व कोरोनाचा संसर्ग न होण्यात त्याची मोठी मदत झाली, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल आणि मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकांना लोकल आणि मेट्रो प्रवासाची परवानगी द्यायला हवी. लॉकडाऊनमुळे लोकांसह व्यापारांचे देखील हाल होत आहेत. अमेरिकेत दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना विविध परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे व्यापर आणि रोजगार सुरु करण्यासाठी अमेरिका पॅटर्न राबवण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

दरम्यान, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना, तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून निर्बंध हटविण्याची मागणी होत आहे. बाजारपेठा खुल्या करण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. राज्याचे अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे आणि त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भावही वाढता कामा नये, याचे संतुलन साधूनच १ जूननंतरच्या निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल. व्यवसाय बुडाले, रोजगार गेला आता निर्बंध नकोत या लोकभावनेचा विचार केला जाईल, असं विजय वडेट्टीवर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

१५  जिल्हे रेड झोन 

१५ जिल्ह्यांत अजूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. तेथे निर्बंध पूर्वीसारखेच कायम राहण्याची शक्यता आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, सोलापूरचा समावेश आहे. 

मुंबई, नागपूर, पुणे  शहर नियंत्रणात

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, डॉक्टरांचा टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि गृह विभागाशी चर्चा करून लवकरच निर्बंधांचे स्वरूप निश्चित करण्यात येईल. मुंबई, नागपूर, पुणे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.  संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादणे उचित ठरणार नाही. त्यामुळेच निर्बंधांचे स्वरूप जिल्हानिहाय ठरविले जाण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेउद्धव ठाकरेलोकलकोरोनाची लसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार